
तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (पुणे) : रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने पुणे शहरासह पूर्व हवेली तालुक्यात हाहाकार माजवला. रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने अनेक गावे जलमय झाली. नागरिकांच्या घरात पाणी शिरले, शेतीपिके भुईसपाट झाली, वाहनांचे अपघात झाले तर व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे खरिपातील ऊस, कोथिंबीर, पालक, फुलशेती यासह अनेक पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातील घास हिरावला गेला आहे. शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाहतूक ठप्प – घरे व वस्त्यांचा संपर्क तोडला…
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लोणी स्टेशनजवळील मालधक्क्याकडून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. अनेक ठिकाणी दुचाकी-चारचाकी वाहने वाहून गेली. अपघातांमुळे वाहनांचे नुकसान झाले तर नागरिकांच्या घरांची पडझड होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
रामाकृष्णी रसायन कंपनीकडे जाणारा पूल पाण्याखाली गेल्याने राहिंज वस्तीचा संपर्क तुटला. कदमवाकवस्ती येथील घोरपडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी ओसंडून वाहत असल्याने ५०० हून अधिक घरांचा संपर्क तुटला. तर रामदरा पूल बंद झाल्याने वड्यावस्त्यांनाही तोडावे लागले.
व्यवसायिकांचे करोडोंचे नुकसान…
कदमवाकवस्तीतील अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. “जेके फर्निचर, जेके सेल्स इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊन आणि आर वर्ड इंटरियर मॉड्युलर फॅक्टरी यामध्ये पाणी शिरल्याने तब्बल तीन कोटींचे नुकसान झाले,” अशी माहिती उद्योजक रिजवान खान यांनी दिली.
पूरस्थितीसाठी अतिक्रमण जबाबदार ग्रामस्थ…
दरवर्षी पाटील वस्तीत पूरस्थिती निर्माण होत असल्याचे ग्रामस्थ प्रतिक काळभोर यांनी सांगितले. “ओढ्यातील अतिक्रमणामुळे ही परिस्थिती उद्भवते. प्रशासनाने नकाशानुसार ओढा पुन्हा खोदावा व अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
विजपुरवठा खंडित…
पावसामुळे लोणी काळभोर व कदमवाकवस्तीतील वीजपुरवठा खंडित झाला. “झाडे व फ्लेक्स तारा तुटल्याने वीजपुरवठा बंद पडला. कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून उद्यापर्यंत पुरवठा सुरळीत होईल,” असे सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ यांनी सांगितले.
धरणातून विसर्ग – नदीला पूर…
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मुळा-मुठा नदीला पूर आला असून बॅक वॉटरचे पाणी एमआयटी युनिव्हर्सिटी परिसरासह इतर भागात शिरले.
Editer sunil thorat





