
पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पुर्व हवेली पावसाचा धुमाकूळ कदमवाकवस्ती परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला. जवळपास काही तासांत तब्बल १८० मिमी पाऊस नोंदवला गेला. त्यामुळे कदमवाकवस्ती गाव व परिसरातील जवळपास ५० घरांमध्ये व दुकानात पाणी शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी थेऊर येथील रात्रभर चाललेल्या मदत कार्यात सहभागी होत मदतकार्यातून 60 जणांची सुखरूप सुटका केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

पहाटे तीनच्या सुमारास पाणी झपाट्याने वाढून वस्तीतील घरात गळ्यापर्यंत पाणी शिरले. नागरिक अंधारात घरात अडकून पडले होते. कॉल मिळताच वाघोली अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी रश्शीचा आधार घेऊन नागरिकांना बाहेर काढले. काही ठिकाणी पाळीव जनावरे, शेळ्या, कोंबड्या वाचवण्यात यश आले; परंतु अनेक प्राणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
अग्निशमन अधिकारी विजय महाजन यांनी सांगितले की, “ओढ्याचे तोंड अरुंद असल्याने आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी पाणी वळवण्यासाठी उभारलेली भिंत अडथळा ठरली. त्यामुळे पाणी थेट वस्तीत शिरले. रात्रीच्या अंधारात ओढ्याचा प्रवाह लक्षात येत नव्हता. शेवटी जेसीबीच्या सहाय्याने ती भिंत तोडून पाण्याचा मार्ग मोकळा केला आणि परिस्थिती आटोक्यात आली.” हे ऑपरेशन सकाळी आठपर्यंत सुरू होते.
नागरिकांचे मोठे नुकसान
पाण्यामुळे वस्तीतल्या घरांतील अन्नधान्य, कपडे, फर्निचर, वीज साहित्य यांचे नुकसान झाले आहे. अचानक पाण्याचा पूर आल्याने नागरिकांना घराबाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी येऊन वस्तीत शिरल्याची घटना यापूर्वी झालेली नव्हती.

जिल्ह्यातील विविध ठिकाणीही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये):
हवेली (कदमवाकवस्ती) – १८०
दौंड – ८५
चिंचवड – ८२
शिवाजीनगर – ६०
पाषाण – ६०
डुडुळगाव – ५७
हडपसर – ५६
बारामती – ५२
मगरपट्टा – ४८
प्रशासन सज्ज…
अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे. तहसिलदार कार्यालय, ग्रामपंचायत व आपत्कालीन पथकांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून, आवश्यक ती मदत पुरवली जात आहे.
Editer sunil thorat





