
कदमवाकवस्ती (पुणे) : कदमवाकवस्ती गावात रविवारी झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीसदृश्य पावसामुळे गावातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक घरांत पाणी शिरल्याने घरगुती साहित्य, अन्नधान्य व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे ग्रामस्थ हतबल झाले असताना ग्रामपंचायत प्रशासन तातडीने त्यांच्या मदतीला धावले.
आज झालेल्या पाहणीत सरपंच चित्तरंजन गायकवाड, माजी सरपंच गौरी गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरले आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला. नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत मिळावी यासाठी प्रशासनाशी समन्वय साधल्याची माहिती सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी दिली.
सरपंच चित्तरंजन गायकवाड म्हणाले, “संकट काळात ग्रामस्थ एकटे नाहीत. ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आवश्यक ती मदत व कार्यवाही निश्चित करण्यात येईल.”
दरम्यान, ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्या सर्व कुटुंबियांसाठी आज ग्रामपंचायतीच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तातडीची मदत, पंचनामा आणि पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येणार असल्याचे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने दिले.
या वेळी माजी सरपंच गौरी गायकवाड यांनी ग्रामस्थांना धीर देत, “गावकऱ्यांनी धैर्य ठेवून सहकार्य करावे. ग्रामपंचायत व प्रशासन एकत्रितपणे या आपत्तीवर मात करण्यासाठी प्रयत्नशील आहे.” असे सांगितले.
Editer sunil thorat






