उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत सायकल पेट्रोलिंगचा शुभारंभ ; अल्ट्राटेक सिमेंटकडून ५ सायकली प्रदान…

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पोलीस-जनता सुसंवाद अधिक मजबूत करण्यासाठी सायकल पेट्रोलिंग उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत पोलीस स्टेशनसाठी एकूण ५ सायकली प्रदान करण्यात आल्या असून, आज रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड विभाग, बापूराव दडस यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
या सायकल पेट्रोलिंग उपक्रमामागील प्रमुख उद्देश म्हणजे..
१) हद्दीत गस्त वाढवून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे व गुन्हे प्रतिबंध करणे.
२) पोलिस कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला चालना देऊन त्यांचे आरोग्य सक्षम राखणे.
सायकल पेट्रोलिंगमुळे पोलीस दल अधिक चपळाईने व सहजतेने नागरिकांपर्यंत पोहोचणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यात मदत होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल तसेच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये फिटनेस संस्कृतीला प्रोत्साहन मिळणार आहे.
हा उपक्रम पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला असून, स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
Editer sunil thorat





