“डिजिटल मीडियाला शासनमान्यता व जाहिराती मिळवून देण्यासाठी लढा उभारणार ; एस.एम. देशमुख; सरकारच्या चालढकल धोरणावर संतप्त फटकार”…

…ठळक मुद्दे…
👉 डिजिटल मीडियाला अधिस्वीकृती व शासनाच्या जाहिराती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – एस.एम. देशमुख
👉 संभाजीनगरात डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन भव्यदिव्य उत्साहात
👉 युट्यूब चॅनेल्स, पोर्टल, ब्लॉग संपादकांचा सन्मान; हजारो पत्रकारांची उपस्थिती
संभाजीनगर : डिजिटल मीडियाला शासनाकडून अधिस्वीकृती, ओळखपत्र, विविध योजना आणि जाहिरातींचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी ग्वाही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी दिली. “आम्ही पत्रकारांची मातृसंस्था असल्याने, डिजिटल माध्यमांमध्ये उत्तम कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे हक्क मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे,” असेही ते म्हणाले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. राज्यभरातील ३४ जिल्ह्यांमधील पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, सदस्य तसेच डिजिटल मीडियामध्ये कार्यरत हजारो पत्रकारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
अधिवेशनातील ठळक मुद्दे…
डिजिटल माध्यमांचा गावोगाव विस्तार : देशमुख म्हणाले की, गावपातळीपर्यंत युट्यूब चॅनेल्स, पोर्टल्स आणि ब्लॉग सुरू झाले आहेत. काही चॅनेल्स अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत असून, त्यांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाईल.
सरकारवर टीका : “पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्षे उलटली तरी अधिसूचना काढण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न, पत्रकार पेन्शन आदी विषय प्रलंबित आहेत,” असा आरोप देशमुख यांनी केला.
भविष्यातील दिशा : डिजिटल पत्रकारांना शासनमान्यता, विविध योजना आणि जाहिरातींचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी आश्वासन दिले.
विविध न्यूज संपादकांचा सन्मान…
अधिवेशनात डिजिटल मीडियामध्ये प्रभावी कार्य करणाऱ्या ८ संपादकांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
1. रवींद्र आंबेकर, मॅक्स महाराष्ट्र (मुंबई)
2. मल्हार संतोष पवार, न्यूज 24 (माथेरान, रायगड) – 12 लाख सबस्क्राईबर्स
3. आफताब मन्सूर शेख, न्यूज टुडे 24 (अहिल्यानगर) – 2.80 लाख सबस्क्राईबर्स
4. पुजा अनिल बन्ने, गावाकडची टेस्ट (जत, सांगली) – 2.86 लाख सबस्क्राईबर्स
5. उमेश घोंगडे, बखर लाईव्ह (पुणे) – 7.26 लाख सबस्क्राईबर्स
6. महेश जगताप, सोमेश्वर रिपोर्टर लाईव्ह पोर्टल (बारामती) – 1.85 लाख सबस्क्राईबर्स
7. प्रभू दिपके, दै. लोकसमिक्षा – 1.67 लाख सबस्क्राईबर्स
8. आरिफ शेख, डी 24 संभाजीनगर
सन्मान सोहळ्याचे वितरण डॉ. भागवत कराड आणि एस.एम. देशमुख यांच्या हस्ते पार पडले.
व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर…
परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मंसूरभाई शेख, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो.पी. लांडगे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे, डॉ. मोहम्मद अब्दुल कदीर, जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार, प्रसिद्धी प्रमुख संदिप कुलकर्णी, सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat








