लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरात ढगफुटी सदृश पावसाने वीजपुरवठा ठप्प ; महावितरणच्या वायरमननी जीव धोक्यात घालून १२ तासांत गावाला दिला दिलासा..

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : १४ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परिसरात अक्षरशः जलप्रलयाचे चित्र निर्माण झाले. रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्या, घरात पाणी शिरल्याने दोन मीटरपर्यंत पाणी भरले आणि रात्री बारा वाजता संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.
एमआयटी कॉर्नर, आयओसीएल कंपनी परिसर, कवडीपाट टोलनाका येथे उच्चदाब वीज वाहिन्यांचे सात ते आठ खांब पडले होते.
या भीषण परिस्थितीत लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील तब्बल २२ हजार ग्राहक अंधारात होते. उप कार्यकारी अभियंता महेश धाडवे, सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाण्यातून मार्ग काढत पाहणी सुरू केली. ग्राहकांनी “घरात पाणी आहे, कृपया वीज पुरवठा सुरू करू नका” असे विनंतीचे फोन केल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.
पाणी ओसरताच शाखा कार्यालयाचे लाईनमन पी. एस. खरमाटे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचे दोन पथक करून फुरसुंगी फिडरपासून पुरवठा पूर्ववत करण्याची धडपड सुरू झाली.
संभाजीनगर येथील सिराज सय्यद, इंदिरानगर येथील अबू सय्यद, रामदारा येथील योगेश गिरी, लोणी गावातील अजय डोंगरे यांनी आपापल्या भागात मेहनत घेतली.
टोलनाका परिसरात पडझड झाल्याने वायरमन पांडुरंग खरात, अक्षय पाटील व रोहित काळभोर यांनी क्रेन बोलावून झाडे हटवली.
गावठाण व लोणी कॉर्नर परिसरात अमोल शेलार व योगेश गाडेकर यांनी पर्यायी लाईन खेचून पुरवठा सुरू केला. दादा चौधरी व मुस्तफा शेख यांनी ट्रान्सफॉर्मर बंद करून माळी मळा व राहिंज वस्तीतील काम केले, तर विशाल मोरे, हिमांशू काळभोर, दादा आगळे यांनी इतर भाग सुरळीत केले.
अवघ्या १०-१२ तासांत महावितरण लोणी काळभोर शाखेने लोणी काळभोर व कदमवाकवस्ती वीजपुरवठा पूर्ववत करून नागरिकांना दिलासा दिला. नागरिक, स्थानिक प्रतिनिधींच्या सहकार्यामुळे हे ‘मोठे काम सहज शक्य झाले’ असे महावितरणाचे सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ यांच्याकडून सांगण्यात आले.
Editer sunil thorat










