
हैदराबाद : देशातील अव्वल बॅडमिंटनपटूंमध्ये गणना होणारी, कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक विजेती ज्वाला गुट्टा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी कारण खेळ नसून तिची आईसदृश माया. ज्वाला हिने तब्बल ३० लिटर ‘ब्रेस्ट मिल्क’ दान करून नवजात बालकांना जीवनदान दिले आहे. तिच्या या संवेदनशील आणि सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्वाला गुट्टा नुकतीच आई बनली असून, तिने स्तनपानातून तयार झालेले दूध केवळ स्वतःच्या बाळापुरते मर्यादित न ठेवता, दुधाची कमतरता भासणाऱ्या नवजातांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’मध्ये दान केले. या दानामुळे अकाली जन्मलेल्या बाळांना व अशा मातांना ज्यांना स्वतः दूध पाजता येत नाही, त्यांच्या मुलांना मोठा आधार मिळणार आहे.
“आई बनल्यावर मला जाणवलं की हे दूध फक्त माझ्या मुलासाठीच नाही, तर इतर अनेक लहानग्यांसाठीही जीवनदायी ठरू शकतं. प्रत्येक बाळाला मातृदूध मिळालं पाहिजे. ही माझी समाजासाठीची छोटीशी सेवा आहे,” असे ज्वालाने सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) नवजातांसाठी पहिल्या सहा महिन्यांपर्यंत मातृदूध सर्वोत्तम अन्न मानले जाते. पण अनेक वेळा मातांना दूध कमी प्रमाणात येते किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे ते शक्य होत नाही. अशा वेळी ‘मिल्क बँक’मधील दान दिलेलं दूध बाळांचे आयुष्य वाचवते.
ज्वालाच्या या उपक्रमानंतर सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. खेळाडू, सेलिब्रिटींपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी तिच्या या कृतीचे मनःपूर्वक अभिनंदन केले. “गोल्ड मेडल मिळवणारी खेळाडू आता खरी गोल्डन मदर ठरली आहे,” अशा प्रतिक्रिया उमटल्या.
खेळात पराक्रम गाजवलेल्या ज्वाला गुट्टाने आता मातृत्वाच्या माध्यमातूनही नवा आदर्श घालून दिला आहे. तिच्या या उपक्रमामुळे समाजातील इतर मातांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat






