नवरात्र उत्सव २०२५ निमित्त वेहेरगाव-कार्ला येथे वाहतुकीत बदल…

पुणे दि. १९ सप्टेंबर : मावळ तालुक्यातील मौजे वेहेरगाव, कार्ला येथील श्री एकविरा देवी नवरात्र उत्सव २०२५ (दि. २२ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५) दरम्यान हजारो भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित आहे. भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीवर विशिष्ट निर्बंध लावण्यात आले असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
वाहतुकीवरील निर्बंध…
दि. २२ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ : कार्ला फाटा ते श्री एकविरा देवी पायथा मंदिर या मार्गावर अवजड व मोठ्या वाहनांना पूर्णवेळ प्रवेशबंदी (No Entry) राहील.
दि. २७ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२५ – सकाळी ६.०० ते रात्री १०.०० या वेळेत जुना मुंबई–पुणे व पुणे–मुंबई महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका (लोणावळा) ते वडगाव फाटा (वडगाव मावळ) या दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल.
वाहन चालकांनी पर्यायी मार्ग वापरावा…
पुण्याकडे जाणारी अवजड वाहने : जुना मुंबई–पुणे महामार्गावरील कुसगाव बुद्रुक टोलनाका, लोणावळा येथून एक्सप्रेस हायवेने उर्से टोलनाका मार्गे पुणे शहराकडे वळविण्यात येतील.
मुंबईकडे जाणारी अवजड वाहने : वडगाव येथील तळेगाव फाटा मार्गे उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेने मुंबईकडे वळविण्यात येतील.
प्रशासनाचे आवाहन…
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी वरील आदेशांचे पालन करावे. प्रशासनास सहकार्य करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
या बदलांमुळे उत्सव काळात भाविकांना मंदिर दर्शनासाठी सुरक्षित, सोयीस्कर व अडथळेमुक्त वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
Editer sunil thorat



