पक्ष सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही! उद्धव ठाकरेंची रोखठोक भूमिका; पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर कडक आदेश…

मुंबई, (दि.२०) : राज्यातील महापालिकांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने आपली रणनिती आखायला सुरुवात केली आहे. मातोश्रीवर शुक्रवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आपली ठाम व रोखठोक भूमिका मांडली.
“निष्ठावंतांनाच उमेदवारी; परतणाऱ्यांना नाही संधी”
बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, “पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. मात्र, जो पडत्या काळात निष्ठेने पक्षासोबत उभा राहिला, त्याला शंभर टक्के साथ मिळेल.” त्यांच्या या विधानाने शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला असून परत आलेल्या बंडखोरांसाठी दार कायमचे बंद झाल्याचा संदेश गेला आहे.
मनसेसोबतच्या युतीवर चर्चा…
महापालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि मनसे युती होणार का, याबाबत चर्चेला उधाण आले होते. यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मनसेसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच युतीबाबत निर्णय घेतला जाईल.” यामुळे मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
पदाधिकाऱ्यांना कडक आदेश…
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट आदेश दिले की हवेदावे विसरून निवडणूक तयारीला लागा. स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवा. मतदानाच्या दिवशी दुबार मतदान होणार नाही, याची काटेकोर खबरदारी घ्या. एका जागेसाठी अनेक इच्छुक असतील तरी मत्सर न करता पक्षाच्या झेंड्यासाठी लढा.
त्यांनी स्पष्ट केले की, “पक्षाच्या उमेदवाराला वैयक्तिक मत्सरापेक्षा पक्षाची ताकद महत्वाची आहे. उमेदवारी कुणालाही मिळो, सर्वांनी एकदिलाने लढा दिला पाहिजे.”
कंबर कसलेल्या निवडणुका…
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण-डोंबिवली येथील पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली. येत्या निवडणुकांसाठी पक्षाने कंबर कसली असून, सर्व निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावरच सत्ता मिळवायची ठरवल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
मुंबईचे माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक लढवण्याचे स्पष्ट मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या या आदेशांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली असून, शिवसेना पुन्हा एकदा ताकदीने उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Editer sunil thorat



