कदमवाकवस्तीतील सिद्धिविनायक सोसायटी परिसरात १० लाखांच्या निधीतून रस्ता काँक्रीटीकरण ; फलक फाडल्याचा प्रकार उघड ; प्रविण काळभोर यांची फेसबुकवरून खंत..

कदमवाकवस्ती (हवेली) : कामानिमित्त कदमवाकवस्तीतील सिद्धिविनायक सोसायटी येथे आलेल्या जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रविण काळभोर यांनी परिसरातील रस्त्याच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित केला. या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी त्यांनी आपल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १० लाख रुपये मंजूर करून काम पूर्ण केले. नव्या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, या कामाची माहिती देणारा फलक अज्ञात व्यक्तींनी फाडल्याचे निदर्शनास आले. यावर प्रविण काळभोर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून फाडलेल्या फलकाचा फोटो पोस्ट करत स्पष्ट खंत व्यक्त केली.
प्रविण काळभोर काय म्हणाले?
“या अवस्थेचं मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कारण कदमवाकवस्ती परिसरातील जवळपास सगळ्या कामांच्या बोर्डांची अशीच अवस्था करण्यात आली आहे. पण असो… काम केल्याचं समाधान या सगळ्यांहून मोठं असतं. लोकांच्या मनातील कामांचा बोर्ड कुणी फाडू शकत नाही.
लोकांना आवश्यक असलेला रस्ता मिळाल्याचं समाधान हेच खरं समाधान आहे. आणि ज्याने बोर्ड फाडला त्यालाही तो फाडण्याचं समाधान देता आलं , हे ही काही कमी नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी फेसबुकवर दिली.
नवीन सिमेंट रस्ता झाल्यामुळे पावसाळ्यातील चिखल, खड्डे, वाहतुकीची कोंडी यापासून कायमची सुटका झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. “बोर्ड फाडले तरी रस्त्याचा वापर आम्हाला दररोज करावा लागतो. कामं झाल्याशिवाय विकास दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारांनी कामाचं महत्त्व कमी होत नाही,” अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.
प्रविण काळभोर यांनी बोलताना राजकीय संदेश असा दिला की फलक फाडण्याच्या या प्रकारावरून स्थानिक राजकीय पातळीवरही चर्चा रंगली आहे. संदेश स्पष्ट आहे की “काम हीच खरी ओळख आहे. मनातील नाव कुणी पुसू शकत नाही.”
Editer sunil thorat



