पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल; “आईच्या नात्याचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही”

सांगली : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच त्यांच्या वडिलांविषयी केलेल्या अपशब्दांमुळे राज्यातील राजकारणात चांगलाच गदारोळ माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाल्याने आज सांगलीत ‘संस्कृती बचाव मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्च्यात खासदार अमोल कोल्हे यांनी नाव न घेता पडळकर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
“मातृत्वाचा अवमान समजू न शकणाऱ्याला मंगळसूत्राचं पावित्र्य काय कळणार?”
मोर्चात बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “सांगलीत आल्यानंतर ‘ते’ संबोधन अनेकदा ऐकलं होतं, पण नेमकं काय ते कळलं नव्हतं. मात्र पडळकरांचं विधान ऐकल्यानंतर समजलं. ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही, त्याला मंगळसूत्राचं पावित्र्य काय कळणार? आई हे जगातलं असं एकमेव नातं आहे, जे नऊ महिने गर्भात बाळाला ठेवतं. लेकरू लाथा मारलं तरीही त्याला आपल्या काळजातलं दूध पाजते. अशा आईच्या नात्याचा अवमान होत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना याचं दुःख का होत नाही? कुणाची छाती झाली नाही का? की पाठीचा मणका राहिला नाही?”
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर कोल्हेंची थेट टीका…
मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधताना अमोल कोल्हे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांवर आमच्या अपेक्षा होत्या. आपण सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहात. राज्याचे प्रमुख म्हणून आम्हाला अपेक्षा होती की आपण या वक्तव्याचा निषेध कराल. पण आपलं विधान काय आलं? – आक्रमक नेते आहेत म्हणून तुम्ही मोकळं सोडणार आहात? लहानपणी आम्हाला शिकवलं होतं – ‘A man is known by the company he keeps’. म्हणजे माणूस जसा सहवास ठेवतो तसा तो असतो. हे खरं असेल, तर तुमच्या आजूबाजूच्या वाचाळविरांमुळे तुमची प्रतिमा मलिन होते.”
“द्रौपदी वस्त्रहरणावेळी भीष्म-द्रोणांसारखं मौन?”
पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन न ठेवता कारवाई करावी. अन्यथा आपणही भीष्म-द्रोण-कृपाचार्यांसारखी मौन भूमिका बजावत आहात, असं आम्हाला समजावं लागेल. किंवा धृतराष्ट्रासारखा अप्रत्यक्ष पाठिंबा आपण देत आहात, असं समजावं लागेल. महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे.”
अमोल कोल्हेंनी ऐकवला शेर…
शेवटी कार्यकर्त्यांच्या टाळ्यांच्या गजरात अमोल कोल्हेंनी त्यांना लिहून दिलेला शेर ऐकवला –
“ईडी, ईव्हीएम, भौकने वाले…, फौज तेरी भारी है;
जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील अभी तुम सब पे भारी है.”
राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा…
या मोर्चाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पडळकरांच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अधिक आक्रमक होत असून, पुढील काही दिवसांत या वादाचा ताप राज्यभर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
Editer sunil thorat



