कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी १८ हजारांची लाच स्वीकारणारी महिला रंगेहात…

अहमदनगर : कुणबी जातीचे जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी करून तडजोडीत १८ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिलेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे.
उषा मंगेश भिंगारदिवे (वय ३३, रा. श्रीनाथ कॉम्प्लेस, भिस्तबाग चौक) असे आरोपी महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे ती कोणत्याही शासकीय सेवेत नसून खासगी महिला असून, तिने ही रक्कम जात पडताळणी कार्यालयातील अधिकारी व इतर १०-१५ जणांसाठी घेतल्याचे कबूल केल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारीनंतर एसीबीची कारवाई…
एका तक्रारदाराने आपल्या १९ वर्षीय मुलीसाठी कुणबी जातीचे पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी यावर्षी जून महिन्यात जिल्हा समितीकडे अर्ज केला होता. मात्र, बराच काळ उलटूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने तो चिंतेत होता. ऑनलाइन अर्जाची चौकशी करताना त्याला एका सायबर कॅफे कर्मचाऱ्याने आरोपी महिलेचा संपर्क दिला.
महिलेने काम करून देण्याचे आश्वासन देत सुरुवातीला २० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी असल्याचे तिने सांगितले. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने व्हॉइस रेकॉर्डरद्वारे पडताळणी केली असता महिलेने विविध ठिकाणी चर्चेदरम्यान लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. अखेर १८ हजार रुपयांवर तडजोड झाली.
पैसे स्वीकारताच सापळ्यात अडकली…
तक्रारदाराकडून ९,५०० रुपयांच्या खऱ्या नोटा आणि ८,५०० रुपयांच्या बनावट नोटा पावडरसह तयार करण्यात आल्या. नियोजित ठिकाणी, जुना पिंपळगाव रोडवर, तक्रारदाराने आरोपी महिलेच्या हाती १८ हजार रुपये दिले. त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकून तिला रंगेहात पकडले.
कबुली पण पुढे काय?
चौकशीत महिलेने ही रक्कम जात पडताळणी समिती कार्यालयातील अधिकारी व इतर १०-१५ जणांसाठी असल्याचे कबूल केले आहे. मात्र या अधिकाऱ्यांवर प्रत्यक्षात कारवाई होणार की प्रकरण पुन्हा दडपले जाणार, याबाबत नागरिक शंका व्यक्त करत आहेत.
दलालांचा सुळसुळाट…
अहिल्यानगर येथील जात पडताळणी समिती कार्यालयात दलालांचा सुळसुळाट असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मिलीभगतीने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची सर्रास लुट सुरू असल्याचे चित्र या कारवाईनंतर उघड झाले आहे. कुणबी प्रमाणपत्र प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Editer sunil thorat



