लोणी काळभोर पोलीस स्टेशनतर्फे “एक मंडळ – एक पोलीस अंमलदार” योजना; नवरात्रोत्सव शिस्तबद्ध व सुरक्षिततेत साजरा होणार…

लोणी काळभोर (ता. हवेली) : सालाबादप्रमाणे याही वर्षी दि. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत असून दि. ६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. यानिमित्त लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत एकूण २७ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी पोलीस परवानगी घेतली आहे. एक
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संकल्पनेनुसार “एक मंडळ – एक पोलीस अंमलदार” ही योजना यावर्षीदेखील राबविण्यात आली आहे. या योजनेमागचा उद्देश म्हणजे स्थानिक मंडळ व पोलीस प्रशासन यांच्यात थेट संपर्क ठेवणे, सणादरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी तत्काळ सोडवणे, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणे तसेच अनावश्यक गैरसमज, वाद वा अनुशासनभंग टाळणे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र पोलीस अंमलदार नेमण्यात आला असून पदाधिकाऱ्यांच्या पूर्वतयारीच्या बैठकीत अंमलदारांची ओळख करून देण्यात आली आहे. याशिवाय “नवरात्रोत्सव २०२५ लोणी काळभोर पो.स्टे.” या नावाने व्हॉट्सअॅप गट तयार करण्यात आला आहे, ज्याद्वारे तातडीच्या सूचना व समन्वय साधला जाणार आहे.
या उपक्रमाचे मार्गदर्शन डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-५) व मा. श्रीमती अनुराधा उदमले, सहाय्यक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) यांनी केले आहे. तर राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांच्या पुढाकारातून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, मंडळाकडून कोणतेही कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित अंमलदार व गोपनीय विभागातील अंमलदार पो. ह.वा. रवि आहेर (मो. ९९२३८१०१८१) व बापू वाघमोडे (मो. ९८५००३२५७५) यांना पूर्वकल्पना द्यावी.
“नवरात्रोत्सव शिस्तबद्ध, शांततेत व सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.
Editer sunil thorat



