वानवडीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास…

पुणे : परिमंडळ ५ मधील वानवडी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ३७ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास नऊ महिने अतिरिक्त सश्रम कारावास अशीही शिक्षा सुनावली आहे.
ही धक्कादायक घटना ३ ऑगस्ट २०२१ ते २९ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वानवडी येथील राधिका एम्पायर सोसायटीमध्ये घडली. आरोपी संजय रमेश शर्मा (वय ५६, रा. फ्लॅट नं. बी-११, राधिका एम्पायर, जगताप नगर, वानवडी, पुणे) हा पिडीत अल्पवयीन मुलीला क्लाससाठी घरी बोलावून तिला बेडरूममध्ये नेऊन, तिच्या बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत, तिच्यावर वारंवार अत्याचार करीत होता. मुलगी अल्पवयीन असल्याची जाणीव असतानाही आरोपीने हा घृणास्पद प्रकार केला.
याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९३/२०२१ भा.दं.वि. कलम ३७६, ३७६ (३) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सुधा चौधरी यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सदर खटला सत्र प्रकरण क्र. १००२/२०२१ असा चालला. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील नितीन कोंघे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. कोर्ट पैरवी पोहवा दिनेश जाधव यांनी कामकाज पार पाडले. सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवर विश्वास ठेवत मा. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश (बा.लें.अ.सं.का.), शिवाजीनगर, पुणे यांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
या प्रकरणात तपास व कोर्ट पैरवीबाबत उत्तम कामगिरीबद्दल परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी तपासी अधिकारी पोउनि सुधा चौधरी व कोर्ट पैरवी पोहवा दिनेश जाधव यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांनी संपूर्ण प्रकरणाचे पर्यवेक्षणही केले.
Editer sunil thorat



