वालचंदनगर इंडस्ट्रीजकडून अत्याधुनिक गियर उत्पादन सुविधेची भूमिपूजा…

डॉ गजानन टिंगरे
वालचंदनगर (ता.इंदापूर) : अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेच्या प्रवासात आणखी एक भक्कम पाऊल टाकत वालचंदनगर इंडस्ट्रीजने अत्याधुनिक गियर उत्पादन सुविधेकडे वाटचाल सुरू केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांच्यासह वरिष्ठ सहकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच भूमिपूजा करण्यात आली. या औपचारिक कार्यक्रमाने वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या औद्योगिक प्रगतीला नवा आयाम प्राप्त झाला आहे.
कंपनीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, ही नवीन सुविधा अचूकता, गुणवत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. गियर उत्पादनाच्या क्षेत्रात नवीन बेंचमार्क निश्चित करणे आणि देश-विदेशातील वाढत्या औद्योगिक गरजा पूर्ण करणे हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे.
चिराग दोशी यांनी यावेळी सांगितले की, “वालचंदनगर इंडस्ट्रीज ही परंपरेने गुणवत्तेची शिखरे गाठणारी कंपनी आहे. आता या अत्याधुनिक गियर उत्पादन सुविधेमुळे आम्ही अधिक सक्षम होऊन देशाच्या औद्योगिक विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकू. ही केवळ एक सुविधा नसून उद्याच्या भारतासाठी शक्ती देणारे गियर तयार करण्याची क्षमता आहे.”
या सुविधेमुळे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतीय उद्योगांसाठी सहज उपलब्ध होईल. गियर उत्पादनात अचूकता, गुणवत्ता आणि कार्यक्षमतेचे नवे मानदंड निश्चित करताना कंपनी देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली उपस्थिती अधिक मजबूत करेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वालचंदनगर इंडस्ट्रीजने यापूर्वीही विविध महत्त्वाच्या क्षेत्रात योगदान देत औद्योगिक विकासात आघाडी घेतली आहे. आता अत्याधुनिक गियर उत्पादन सुविधेमुळे देशातील तांत्रिक प्रगती आणि औद्योगिक वाढीस नवी दिशा मिळणार आहे.
Editer sunil thorat




