
कदमवाकवस्ती (ता. हवेली) : अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हरिभाऊ मारुती कदम, तर उपाध्यक्षपदी स्वाती काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 23) पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत या दोघांची सर्वानुमते निवड झाली.
पतसंस्थेचे मावळते अध्यक्ष अशोक कदम व उपाध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद रिक्त झाले होते. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी हरिभाऊ कदम व उपाध्यक्षपदी स्वाती काळभोर यांची निवड करण्यात आली.
या वेळी हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुर्यकांत खैरे, संचालक अशोक कदम, प्रकाश कांबळे, आशा खैरे, तसेच व्यवस्थापक मारुती सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना सन 1992 मध्ये संस्थापक स्व. कल्याण (अण्णा) गुजर यांनी केली. या पतसंस्थेच्या स्थापनामध्ये स्व. ॲड. पी. पी. काळभोर यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. आज पतसंस्था नागरिकांना अल्पदरात कर्जपुरवठा करीत असून तिच्या कामकाजात सातत्याने पारदर्शकता ठेवली जाते. सध्या संस्थेमध्ये 2 कोटी 60 लाख रुपयांच्या ठेवी, तर 2 कोटी 13 लाख रुपयांचे कर्जवाटप झालेले आहे. संस्थेने 65 लाखांची गुंतवणूक केली असून वार्षिक उलाढाल तब्बल 7 कोटी 50 लाख रुपयांची आहे.
“आगामी काळात पतसंस्थेचा कारभार पारदर्शक पद्धतीने करणार असून सर्व संचालक व सभासदांना एकत्र घेऊन संस्थेच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे,” असे नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ कदम यांनी सांगितले.
Editer sunil thorat



