जेएसपीएम जयवंतराव सावंत फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मसी दिन उत्साहात साजरा…
जागतिक औषध बाजारपेठेत 2030 पर्यंत भारत महासत्ता बनेल : रोहित करपे...

हडपसर, (पुणे) : “भारतातील औषध उद्योगाचा झपाट्याने होणारा विस्तार, नव्या संशोधनाला मिळणारे चालना व तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे सन 2030 पर्यंत भारत जागतिक औषध बाजारपेठेत महासत्ता बनेल,” असा ठाम विश्वास रेगेलीया हेल्थकेअर प्रा. लि. पुणेचे संचालक रोहित करपे यांनी व्यक्त केला.
दरवर्षीप्रमाणे २५ सप्टेंबर हा जागतिक फार्मसी दिन जेएसपीएम जयवंतराव सावंत फार्मसी महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा कार्यक्रम महाविद्यालय, ड्रग्गिस्ट व केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट हडपसर विभाग आणि नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमात रिटेल व होलसेल फार्मसी व्यावसायिक, डिस्ट्रीब्यूटर, औषध उत्पादक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
फार्मसी क्षेत्रातील संधींचा लाभ घ्या – करपे यांचे आवाहन…
कार्यक्रमात मार्गदर्शनपर व्याख्यान करताना रोहित करपे यांनी जागतिक पातळीवर फार्मसीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “भारतातील फार्मासिस्टचे योगदान संपूर्ण जग मान्यतेने स्वीकारत आहे. विद्यार्थ्यांनी संशोधन, औषध निर्मिती, वितरण व्यवस्था आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये प्रगती साधली, तर भारत फार्मसी क्षेत्रात क्रमांक एक बनू शकेल. ही फक्त नोकरीपुरती मर्यादित संधी नाही, तर जागतिक नेतृत्वाची सुवर्णसंधी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, फार्मसी ही सन्मानाची व प्रतिष्ठेची फिल्ड आहे, यात करिअर घडवताना विद्यार्थी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देतात.
विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहभाग…
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. औषध उत्पादन, नवे तंत्रज्ञान, जागतिक बाजारपेठ व रोजगाराच्या संधींशी संबंधित विविध प्रश्नांना रोहित करपे यांनी मार्गदर्शन केले. या संवादातून विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आव्हाने व संधींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
स्पर्धा, रॅली व पथनाट्याने कार्यक्रमाला बहार…
जागतिक फार्मसी दिनानिमित्त राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढून समाजात औषधांचे योग्य वापर आणि फार्मासिस्टचे महत्त्व याबाबत संदेश दिला.
हडपसर येथील श्रीराम चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण करून नागरिकांना आरोग्यविषयक जनजागृती केली.
मान्यवरांची उपस्थिती…
कार्यक्रमासाठी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. वसंत बुगडे, डॉ. मारुती काळबांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर, केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास काळे, अमित पाचभाई, वैभव कळमकर, ओमप्रकाश चौधरी तसेच नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सचिन कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
आयोजन समितीचा परिश्रम…
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. स्वप्नील गाडेकर यांनी केले. प्रा. अनुराधा पाटील, प्रा. राज जाधव, प्रा. निकिता कोलते, प्रा. प्रगती लगदिवे, प्रा. चेतन मामडगे, स्वाती माकोने, प्रा. शिंदे, प्रा. थोरात, प्रियांका महाजन, स्वप्नाली सावंत यांच्यासह कर्मचाऱ्यांपैकी पवार काका, चांदणे मावशी व आकांक्षा जाधव यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.
Editer sunil thorat





