मांजरी बुद्रुक झोपडपट्टी भागात महिलांचे धरणे आंदोलन सुरू ; पाणी, स्वच्छता व करमाफीची मागणी…

पुणे : मांजरी बुद्रुक परिसरातील मागासवर्गीय झोपडपट्टी भागात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अखेर महिलांनी धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मांजराईनगर, माळवाडी, कुंजीर वस्ती, वेताळ वस्ती, सटवाई नगर, राजीव गांधी नगर, 116 घरकुल, बहात्तर घरकुल अशा वस्त्यांतील महिला नागरिकांनी शनिवारी (दि. 27 सप्टेंबर 2025) पासून पीर साहेब मंदिर परिसरात दुपारी 1 ते 2 या वेळेत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
मनपाकडून तीन वर्षांत कोणतीही तरतूद नाही…
गाव पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होऊन तीन वर्षे झाली असली, तरी या वस्त्यांमध्ये अद्यापही गलिच्छ वस्ती निर्मूलन, पिण्याचे पाणी, नळजोडणी, स्वच्छता व्यवस्थापन यासाठी कोणतीही ठोस तरतूद किंवा योजना अंमलात आणलेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. महिलांनी या संदर्भात पूर्वीही वारंवार लेखी निवेदन दिले, मात्र प्रशासनाकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे.
महिलांच्या प्रमुख मागण्या…
आंदोलनात सहभागी महिलांनी पुढील मागण्या मांडल्या आहेत –
गलिच्छ वस्ती निर्मूलनाची अधिकृत घोषणा करावी.
घरगुती नळ कनेक्शनसाठी चार इंची बिडाची पाईपलाईन टाकावी.
परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा त्वरित उचलावा.
वापरण्याचे व पिण्याचे पाणी नियमित उपलब्ध करावे.
कचऱ्याचे पैसे आकारू नयेत.
ग.व.नि. अंतर्गत सेवाशुल्क लागू केल्याचे लेखी पत्र द्यावे.
शासन नियमानुसार मागासवर्गीय झोपडपट्टी भागातील कर माफ करावेत.
अन्यायाविरुद्ध लढ्याचा इशारा
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, खान मार्केट, नवी दिल्ली येथे तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका महिलांनी घेतली आहे.
मनपा अधिकाऱ्यांची भेट व आश्वासन
दरम्यान, आज हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी उदय वाढवे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन महिलांशी चर्चा केली. त्यांनी “सदर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील,” असे आश्वासन दिले. मात्र स्थानिक नागरिकांनी आश्वासनांवर विश्वास न ठेवता प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
Editer sunil thorat



