
हडपसर (पुणे) : दि.३० रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज व साधना शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व माजी आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी अध्यक्षस्थानावर विराजमान होते.
डॉ. सबनीस यांनी आपल्या मनोगतात कर्मवीरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक उत्थानासाठी आयुष्य वेचले. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा त्यांनी पुढे नेला. शिक्षकाने ज्ञानसंपन्न, आदर्शवादी व बुद्धीप्रामाण्यवादी विद्यार्थी घडवावा, हीच कर्मवीरांना खरी श्रद्धांजली आहे.”
अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत दळवी म्हणाले की, “रयत मासिकाच्या माध्यमातून सेवकांना प्रगल्भ केले जात आहे. आजच्या पिढीने नोकरीसोबतच स्टार्टअप व व्यवसायिक संधींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. रयत शिक्षण संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इंटरॅक्टिव्ह पॅनलद्वारे दर्जेदार शिक्षणाची सुरुवात केली आहे.”
हर्षदाताई देशमुख-जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘कमवा आणि शिका’ योजनेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैतिक मूल्यांची जडणघडण झाली असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रयतचे विद्यार्थी जागतिक स्तरावर नाव कमवतील.”
या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे-पाटील, अरविंद तुपे, अमर तुपे, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, साधना शैक्षणिक संकुलातील प्राचार्य व मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमात स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच सांस्कृतिक क्षेत्रात पारितोषिक पटकावलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन प्राचार्य उर्मिला पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. छाया सकटे व डॉ. अर्चना पाटील यांनी केले. या वेळी साधना शैक्षणिक संकुलातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat







