मावळ भूमिअभिलेख कार्यालय तपासणीच्या रडारवर ; उपअधीक्षक पल्लवी पिंगळे यांच्या कारभाराची चौकशी सुरू, कर्मचाऱ्यांत खळबळ…

मावळ (पुणे) : मावळ तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील (Maval Land Records Office) उपअधीक्षक पल्लवी पिंगळे (Deputy Superintendent Pallavi Pingale) यांच्या कारभाराची चौकशी शासनाने नियुक्त समितीमार्फत सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्याचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक डॉ. सुहास दिवसे (Dr. Suhas Diwase) यांनी याबाबत आदेश दिले असून, तपासणी प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
महसूलमंत्र्यांचा कडक पवित्रा…
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच भूमिअभिलेख विभागातील भ्रष्टाचार आणि अनियमितता रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवरच विभागातील काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. हवेली तालुक्यातील तत्कालीन उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे यांना निलंबित करण्यात आले होते. आता मावळ उपअधीक्षक पल्लवी पिंगळे यांच्या कामकाजातील अनियमिततेवरून शासन त्यांच्यावरही कडक कारवाई करणार असल्याची जोरदार चर्चा विभागात रंगली आहे.
तपासणी समितीची नियुक्ती…
मावळ उपअधीक्षक कार्यालयातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी नागपूर विभागाचे जिल्हा अधीक्षक भूषण मोहिते, बारामतीचे उपअधीक्षक संजय धोंगडे आणि वाई (सातारा) चे उपअधीक्षक शैलेश साठे या अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशीला सुरुवात केली असून, पुढील काही दिवसांत अहवाल शासनाकडे सादर होणार आहे. या अहवालातून कोणते धक्कादायक खुलासे होतील, याकडे राज्यातील महसूल विभागाचे लक्ष लागले आहे.
पूर्वीचे आदेश, मात्र तपासणी थांबली!
विशेष म्हणजे, तत्कालीन जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सप्टेंबर 2024 मध्येच मावळ उपअधीक्षक कार्यालयाची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र अज्ञात कारणास्तव पुढे ती प्रक्रिया झालीच नाही. त्यामुळे तपासणीच्या आदेशानंतरही कारवाई न झाल्याची बाब संशयास्पद मानली जात आहे. यानंतर आता नवीन आदेशान्वये तपासणी सुरू झाल्याने पुन्हा एकदा या कार्यालयावर ‘कारवाईचा घोंगडा’ आलेला आहे.
गंभीर आरोपांचे सावट…
उपअधीक्षक पल्लवी पिंगळे यांच्यावर चुकीच्या बिगरशेती मोजण्या करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच मावळ तालुक्यातील काही भूकरमापकांच्या नावाने बनावट किंवा अनियमित मोजण्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लोणावळा, खंडाळा, तुंगारली, वलवण या पर्यटनप्रधान भागांत एकाच मोजणीवर सामिलीकरण करून नियमबाह्य कजाप नोंदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
याचबरोबर, कार्यालयातील आवक-जावक लिपिकांना मूळ पदभार सोडून मोजणीसारख्या कामात गुंतवण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी वर्ग, कुटुंबीय किंवा सामान्य नागरिकांकडून येणारे अर्ज, तक्रारी व महत्त्वाची कागदपत्रे घेण्यासाठी कोणतीही जबाबदार यंत्रणा उपलब्ध नव्हती. या निष्काळजीपणामुळे शेतकरी व नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाल्याचे बोलले जात आहे.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे आरोप…
पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. दीपक चव्हाण यांनी या संदर्भात गंभीर माहिती उघड केली आहे. चुकीच्या कामकाजामुळे शासनाचा महसूल बुडवण्यात आला असून, अनियमिततेमुळे प्रामाणिक शेतकऱ्यांना फटका बसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुढील कारवाईकडे लक्ष…
हवेली व जिल्हा अधीक्षक कार्यालयानंतर आता मावळ उपअधीक्षक कार्यालयही तपासणीच्या रडारवर आले आहे. शासन नियुक्त समितीचा अहवाल आल्यानंतर पल्लवी पिंगळे यांच्यावर काय कारवाई होणार? हे ठरवले जाईल. मात्र सध्या तरी या चौकशीमुळे मावळ भूमिअभिलेख कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे.
Editer sunil thorat



