अतिवृष्टीग्रस्त भागाचा जयंतराव पाटील व हर्षवर्धन पाटील यांचा पाहणी दौरा ; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून तातडीच्या मदतीची मागणी…

संपादक डॉ गजानन टिंगरे
सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक भागात शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊस, सोयाबीन, कापूस, ज्वारी, भात यांसारखी हंगामी पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या घरातील संसार उध्वस्त झाला आहे. काही ठिकाणी घरांचे, तर रस्ते व पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राज्यातील अनेक नेत्यांनी बाधित भागांचा दौरा सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने आज विधिमंडळ पक्षनेते व माननीय आमदार जयंतराव पाटील तसेच राज्याचे माजी मंत्री आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रभारी माननीय हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, तसेच परिसरातील इतर नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.
या दौऱ्यात त्यांच्या सोबत स्थानिक खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील आणि आमदार नारायण पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकल्या…
नेत्यांनी शिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे कर्जबाजारीपणाच्या संकटात असलेला शेतकरी आणखी अडचणीत आला असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी मांडले.
स्थानिक शेतकरी बाळासाहेब कदम यांनी सांगितले की, “संपूर्ण उसाची शेती वाहून गेली आहे. घरातले धान्यही पाण्यात भिजले आहे. पंचनामे तातडीने व्हावेत आणि मदत हवी, नाहीतर कुटुंब चालवणं कठीण होईल.”
तातडीच्या मदतीची मागणी…
या वेळी बोलताना जयंतराव पाटील म्हणाले की,
“शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करावे. पंचनामे त्वरीत व्हावेत आणि शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची ठाम मागणी आहे.”
हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की,
“शेतकऱ्यांच्या वेदना आम्ही प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत. अनेक गावात शेतकरी हताश झाले आहेत. पंचनामे वेगाने करून मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावी. आम्ही शासन दरबारी यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.”
मानसिक धीर दिला…
दौऱ्यात नेत्यांनी शेतकऱ्यांना मानसिक आधार दिला. “शेतकरी अडचणीत असताना आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सरकारवर दबाव आणून मदत मिळवून देऊ” असे आश्वासन त्यांनी दिले.
Editer sunil thorat






