मनोज जरांगेंना छत्रपती घराण्याचा धक्का; हैदराबाद गॅझेटवर शाहू महाराजांचं मोठं विधान…
शाहू महाराजांचा सवाल : निजामाचं गॅझेट मराठा समाजाने का स्वीकारावं?

मुंबई/कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने राज्यात पुन्हा एकदा जोर धरला असताना, हैदराबाद गॅझेटच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी थेट निजामाच्या गॅझेटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
जरांगेंचं आंदोलन आणि हैदराबाद गॅझेट…
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषणाला बसून पुन्हा एकदा आंदोलन पेटवलं होतं. लाखो मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. या दबावानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला. ही मागणी मान्य झाल्यानंतर मराठा समाजात समाधानाची लाट होती.
शाहू महाराजांचं वक्तव्य…
मात्र, आता कोल्हापुरात भवानी मंडप येथे ‘कोल्हापूर गॅझेट’ आंदोलनाला सुरुवात करताना काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी मोठं विधान केलं. ते पुढे म्हणाले
“मराठा आरक्षणासाठी आपण संविधानाच्या चौकटीतूनच पुढे जावं लागेल. संविधान लवचिक आहे, अडथळे दूर करून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा लागेल.”
“मराठा समाज अनेक पातळ्यांवर मागासलेला आहे, हे सिद्ध झालं आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे मी दोन वर्षांपासून सांगत आलोय.”
“मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय होणार नाही, याकडेही लक्ष द्यायला हवं.”
निजामाच्या गॅझेटवर आक्षेप…
हैदराबाद गॅझेटबाबत बोलताना शाहू महाराजांनी थेट सवाल उपस्थित केला. ते पुढे म्हणाले
“हैदराबाद गॅझेट हे निजामाचं गॅझेट आहे. आपण त्याला तीन वेळा हरवलं, मग त्याचं गॅझेट का स्वीकारायचं? मराठा आरक्षणासाठी अजून योग्य मार्ग निघालेला नाही, ही खंत आहे.”
चर्चेला उधाण…
शाहू महाराजांच्या या विधानानंतर मराठा समाजात नवी चर्चा सुरू झाली आहे. जरांगे पाटील यांनी ज्या हैदराबाद गॅझेटसाठी लढा दिला, त्यालाच शाहू महाराजांचा विरोधी सूर लागल्याने आरक्षणाच्या चळवळीला वेगळं वळण लागणार का, हा प्रश्न आता सर्वदूर विचारला जातोय.
Editer sunil thorat



