“प्रसिद्ध डॉक्टरांचा मुखवटा फाडला, लग्नाचे आमिष देऊन बलात्कार ; रुग्णाच्या पत्नीशी केलेल्या विश्वासघातानं खळबळ”
"पांढऱ्या कोटाचा काळा चेहरा, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मयूरेश वारके फरार

डोंबिवली : वैद्यकीय पेशाला कलंकित करणारी धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान रुग्णाच्या पत्नीला आधार देण्याच्या बहाण्याने प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic) डॉ. मयूरेश वारके यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याची माहिती मिळताच डॉक्टर फरार झाले आहेत.
नेमके प्रकरण काय?
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीला गँग्रीन झाला होता. उपचारासाठी त्याने अंबरनाथ येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मयूरेश वारके यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी उपचार सुरू केले, मात्र रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याचे पाय कापावे लागले. दुर्दैवाने काही दिवसांत रुग्णाचा मृत्यू झाला.
पतीच्या निधनाने हादरलेल्या आणि मानसिक आधाराच्या शोधात असलेल्या महिलेची परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. वारके यांनी तिच्याशी जवळीक साधली. त्यांचे कुटुंब परदेशात राहत असल्याने त्यांनी त्या महिलेला “मी तुझ्याशी लग्न करेन, तू काळजी करू नकोस” असे सांगून विश्वास संपादन केला. मात्र या आमिषाचा गैरफायदा घेत सातत्याने तिच्यावर बलात्कार केला.
सत्य समोर येताच पोलिसांत धाव…
काही काळानंतर डॉक्टर आपल्याला फसवत असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. वारके यांच्या विरोधात बलात्कारासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल केले.
डॉक्टर फरार – पोलिसांचा शोध सुरू…
गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. मयूरेश वारके फरार झाले असून, मानपाडा पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. अंबरनाथमधील एक प्रतिष्ठित डॉक्टर असूनही त्यांनी रुग्णाच्या पत्नीशी केलेल्या अनैतिक वर्तनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
समाजात संतापाची लाट…
घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि रुग्णांमध्ये संतापाची भावना आहे. रुग्णाच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेमुळे “पांढऱ्या कोटाचा काळा चेहरा” पुन्हा एकदा उघड झाला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय व्यवसायावर विश्वासघाताचा कलंक लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
Editer sunil thorat



