सरन्यायाधीश गवई यांच्यावर हल्ल्याच्या प्रकरणावर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे निवेदन ; कठोर कायदेशीर कारवाईची मागणी…

छत्रपती संभाजीनगर, : (७ ऑक्टोबर २०२५) भारताचे ५२वे सरन्यायाधीश मा. भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना हल्ल्याचा प्रयत्न झाला. राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्याकडे बूट फेकण्याचा प्रयत्न केला, तसेच जातीय द्वेषातून हा हल्ला केला गेला.
यावरून रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रने राष्ट्रपतींना विभागीय उपआयुक्तांच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, हा न्यायालयीन अवमान असून १९७१ च्या कायद्याअंतर्गत न्यायाधीशांवर हल्ला करणे, गोंधळ निर्माण करणे किंवा न्यायालयीन कार्यवाहीत अडथळा आणणे हे गुन्हेगारी अवमान मानले जाते.
पक्षाचे निवेदन असे सांगते की, “लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांना आधार मानून वाद-प्रतिवादातून न्यायव्यवस्थेकडे न्याय मिळतो. या न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेत मुख्य न्यायमूर्तीवर अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न होणे हा केवळ न्यायव्यवस्थेचा नव्हे तर लोकशाहीचा, संविधानाचा आणि देशाचा घोर अवमान आहे.”
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, जर देशाच्या सरन्यायाधीशांवर असे कृत्य घडत असेल, तर सामान्य नागरिक, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त किंवा इतर सरकारी अधिकारी यांच्यासोबत अशा प्रकारचे हल्ले होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटनांवर प्रतिबंध करण्यासाठी, कायद्यात कठोर तरतुदी करून असे कृत्य करणाऱ्यांचे राष्ट्रीयत्वही रद्द करण्याची मागणी निवेदनात केली गेली आहे. निवेदनात असेही नमूद केले आहे की, यापुढे कोणालाही अशा प्रकारचे धाडस करण्याचे साहस होणार नाही.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख लोकनेते राजुभाई साबळे, जिल्हा अध्यक्ष दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, युवा शहराध्यक्ष अर्शद लखपती, तसेच प्रकाश घोरपडे, प्रदीप धनेधर, अनिस गंगापूरकर, शाहीर अशोक शिरसाठ आदी उपस्थित होते.
Editer sunil thorat



