उरुळी कांचन अपघातानंतर 29 तासांनी पोलिसांची पत्रकार ग्रुप वर प्रेस नोट ; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह…

उरुळी कांचन : घटना झाल्यापासून तब्बल २९ तासांनंतर पोलीसांकडून प्रेस नोट प्रसिद्ध केल्याने प्रशासनिक पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५:२० वाजता न्यू अमर टायर दुकान, पीएमटी चौक, उरुळी कांचन येथे झालेल्या अपघाताबाबतची प्रेस नोट ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:१२ वाजता पत्रकारांना पाठवण्यात आली.
प्रशासनिक नियमांनुसार अपघात, गुन्हा किंवा आपत्तीच्या घटनेची प्राथमिक माहिती (Preliminary Note) एक ते दोन तासांच्या आत देणे अपेक्षित असते, तर प्रेस नोट साधारणतः ३ ते ६ तासांच्या आत माध्यमांपर्यंत पोहोचणे आवश्यक मानले जाते. मात्र, उरुळी कांचन पोलिस ठाण्याच्या बाबतीत हे नियम धाब्यावर बसवले गेले असल्याचे सुत्रांकडून समजते.
या संदर्भात संबंधित दौंड उपविभागीय अधिकारी (DYSP) कार्यालयाकडे चौकशी केली असता, “घटनेची माहिती घेतो” असे सांगण्यात आले. मात्र प्रेस नोट उशिरा देण्यामागचे कारण समजू शकले नाही. या घटनेबाबत “प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना?” असा सवाल परिसरातील पत्रकारांनी उपस्थित केला आहे. पत्रकारांच्या एका गटाने, “यापूर्वीही उरुळी कांचन पोलिस स्टेशनकडून प्रेस नोट उशिरा मिळाल्याच्या तक्रारी झाल्या आहेत,” असा आरोप केला आहे.
घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे पत्रकार ग्रुप वर आलेला…
गुन्ह्याचा प्रकार: मोटार अपघात
गु.र.नं.: 276/2025 बी.एन.एस. कलम 125, 281, 324(4), 324(5), 184 मो.वा.का. कलम 184
फिर्यादी: संजय तुळशीराम टिळेकर (वय 63), व्यवसाय – शेती व टायर दुकान, रा. टिळेकर मळा, उरुळी कांचन
आरोपी: लक्ष्मणप्रसाद रामअतवारी, रा. पूरणपूर, ता. तुलसीपूर, जि. बलरामपूर (उत्तर प्रदेश), चालक टँकर MH-43 CK-8903
घटना: ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५:२० वाजता आरोपीने भरधाव टँकर चालविताना नियंत्रण सुटल्याने न्यू अमर टायर दुकानासमोर उभ्या असलेल्या मारुती आल्टो कारला धडक दिली. या धडकेत टँकर दुकानात शिरून आत पार्क केलेली मारुती 800 कार, यामाहा मोटारसायकल, तसेच टायर व दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. चालकास किरकोळ दुखापत झाली.
गुन्हा नोंद: ६ ऑक्टोबर रोजी रात्री ११:१३ वा.
तपास: सहा. फौजदार भोसले
प्रभारी अधिकारी: पो.नि. शंकर पाटील
पत्रकारांची मागणी…
उरुळी कांचन पत्रकार संघाने या प्रकरणी प्रेस नोट उशिरा देण्याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा विलंबामुळे प्रशासनावर संशय निर्माण होणार नाही, यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत, असेही पत्रकारांचे म्हणणे आहे. पुढील काळात प्रेस नोट पोलीस स्टेशनच्या सही / शिक्का असलेली मिळावी.
Editer sunil thorat





