अवघ्या दोन तासांत हरवलेल्या तीन मुलींचा शोध, हडपसर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी ; शिवसेना व राजे क्लब शेवाळवाडी यांच्या वतीने हडपसर पोलिसांचा गौरव…

हडपसर (पुणे) : समाजरक्षक म्हणून ओळख असलेल्या पोलीस दलाने पुन्हा एकदा आपली तत्परता आणि जबाबदारी सिद्ध केली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी साधना शाळेतील हरवलेल्या तीन विद्यार्थिनींचा अवघ्या दोन तासांत शोध लावून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. या तातडीच्या कारवाईबद्दल शिवसेना आणि राजे क्लब शेवाळवाडी यांच्या वतीने हडपसर पोलिसांचा विशेष गौरव करण्यात आला.
घटनेनुसार, साधना शाळेतील तीन मुली शाळा सुटल्यानंतर दुपारी घरी जात असताना अचानक बेपत्ता झाल्या. काही वेळानंतर मुली घरी पोहोचल्या नाहीत, यामुळे पालकांनी चिंतेपोटी पोलिसांकडे धाव घेतली. या तक्रारीची गंभीर दखल घेत हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मित्रमैत्रिणींशी संपर्क साधला आणि सर्व दिशांनी शोधमोहीम हाती घेतली. अखेर केवळ दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तिन्ही मुली सुखरूप सापडल्या. त्यानंतर त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
या संवेदनशील प्रकरणात दाखवलेल्या तातडीच्या आणि कौतुकास्पद कार्याबद्दल समाजातून हडपसर पोलिसांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे. नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले असून, अशा प्रकारच्या तत्परतेमुळे पोलीस दलाबद्दलचा विश्वास आणखी दृढ झाल्याचे मत व्यक्त केले आहे.
या कार्याबद्दल राजे क्लब शेवाळवाडीचे संस्थापक अध्यक्ष अमित (अण्णा) पवार यांनी हडपसर पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांचा विशेष सत्कार केला. यावेळी राजे क्लबचे सदस्य संजीव पडवलकर, संतोष कदम, सागर नाटीकर तसेच हडपसर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना अमित (अण्णा) पवार म्हणाले…
“पोलीस हे समाजाचे खरे रक्षक आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ते दिवस-रात्र झटत असतात. हरवलेल्या मुलींना अल्पावधीत शोधून काढणे ही केवळ तपास कौशल्याची नव्हे, तर संवेदनशीलतेची जिवंत उदाहरण आहे. अशा कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिकच वाढतो.”
या प्रसंगी उपस्थित नागरिकांनीही हडपसर पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईचे कौतुक करत, “अशा जबाबदार अधिकाऱ्यांमुळे समाज सुरक्षित आणि निश्चिंत राहतो,” असे मत व्यक्त केले.
हडपसर पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे स्थानिक नागरिकांत समाधानाचे वातावरण असून, या घटनेने समाज आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले आहे.
Editer Sunil thorat



