कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे ही प्रकाश जगताप यांची जहागिरी नाही ; संचालक प्रशांत काळभोर

तुळशीराम घुसाळकर
लोणी काळभोर (पुणे) : कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे येथे सभापती प्रकाश जगताप हे संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप संचालक प्रशांत काळभोर यांनी केला आहे. “बाजार समिती ही सभापतींची वैयक्तिक जहागिरी नाही,” अशा शब्दांत प्रशांत काळभोर यांनी प्रकाश जगताप यांच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले की, “वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख व अहवाल संचालक मंडळाच्या मंजुरी शिवाय निश्चित करण्यात आला. आमदार चेतन तुपे व बापूसाहेब पठारे यांचे फोटो अहवालातून वगळण्यात आले. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांच्या ऐवजी २५ लाखांचा निधी परस्पर निर्णयाने दिला. सभापतींनी चेक वितरण कार्यक्रमातही कोणत्याही संचालकांना सहभागी करून घेतले नाही. हा एकतर्फी आणि स्वार्थीपणाचा प्रकार आहे.”
काळभोर यांनी पुढे सांगितले की, “यशवंत सहकारी साखर कारखान्यासोबतच्या जमीन खरेदीसंबंधीचा एमओयू सुद्धा संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय करण्यात आला आहे. समितीमध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असून, या गैरकारभाराबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांना लवकरच माहिती देणार आहोत.”
दरम्यान, सभापती प्रकाश जगताप यांनी सर्व आरोप फेटाळले. त्यांनी प्रत्युत्तरात म्हटले की,
“प्रशांत काळभोर यांची उपसभापती होण्याची महत्वाकांक्षा अपुरी राहिल्याने ते केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत. गेल्या तीन महिन्यांत मी सभापतीपद सांभाळत आहे. यापूर्वी अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आक्षेप घेतला नाही. बाजार समितीच्या प्रत्येक बैठकीत ते उपस्थित असतात आणि सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेला २५ लाखांचा निधी कार्योत्तर मंजुरीने देण्यात आला आहे. त्यांनी केलेले सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत.”
Editer sunil thorat



