शिवसेनेचे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांची मागणी ; कदमवाकवस्ती पालखी स्थळावर पोलीस चौकी स्थापन करावी…

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कदमवाकवस्ती पालखी स्थळ परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात शिवसेना पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांनी दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कदमवाकवस्ती परिसरातील लोकसंख्या सुमारे ४० ते ५० हजारांच्या घरात असून, गेल्या काही वर्षांत या भागात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना तात्काळ मदत आणि न्याय मिळवून देण्यासाठी कदमवाकवस्ती पालखी स्थळ येथे पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्हा संघटक निलेश काळभोर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, पालखी स्थळ हे भूगोलदृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण असून, या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे कायमस्वरूपी पोलीस उपस्थिती आवश्यक आहे. चौकी स्थापन झाल्यास केवळ लोणी काळभोर ठाण्याचा ताण कमी होणार नाही, तर गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसही मदत होईल.
या निवेदनाला सामाजिक व राजकीय स्तरावर व्यापक पाठिंबा मिळाला असून, सामाजिक कार्यकर्ते संजय मामा भालेराव, भारतीय जनता पार्टीचे मनोज काळभोर, पत्रकार हनुमंत सुरवसे, पत्रकार महेश फलटणकर आणि सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ओझरकर यांनी या मागणीस आपला पाठिंबा दर्शविला आहे. हे निवेदन गोपनीय विभाग, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे अधिकृतरीत्या नोंदविण्यात आले आहे.
शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर म्हणाले की…
“कदमवाकवस्ती परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची गरज अत्यंत महत्त्वाची झाली आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. त्यामुळे या मागणीचा विचार प्रशासनाने तातडीने करावा.”
कदमवाकवस्ती हा परिसर औद्योगिकदृष्ट्या तसेच वाहतुकीच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, कामगार व नागरिक प्रवास करतात. यामुळे गुन्हेगारी घटना, वाहतूक अपघात व वादांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मांडलेली मागणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे स्थानिकांनी व्यक्त केले आहे.
या निवेदनावर पोलीस प्रशासनाच्या वतीने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले की कदमवाकवस्ती येथे जागेच्या अभावीनेहोत नाही जागा मिळाल्यास दोन ते चार दिवसांत नियोजन करण्यात येईल. असे सांगितले.
हा निर्णय केव्हा घेतला जातो, याकडे कदमवाकवस्ती परिसरातील नागरिक व राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



