मटका जुगार चालकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई ; एक वर्षासाठी नागपूर कारागृहात रवानगी…

लोणी काळभोर (पुणे) : बेकायदेशीर मटका जुगार चालविणाऱ्या सराईत आरोपीवर एमपीडीए (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यान्वये कारवाई करत त्याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या दुरुस्तीनंतर पुणे शहर आयुक्तालयात करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई असल्याने पोलीस वर्तुळात याची व्यापक चर्चा आहे.
तात्याराव महादेव ससाणे (वय ५०, रा. माळी मळा, मारुती मंदिराशेजारी, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे कारागृहात पाठविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्याराव ससाणे हा लोणी काळभोर परिसरात बेकायदेशीर मटका जुगार चालवत होता. त्याच्यावर पोलिसांनी अनेकदा कारवाई केली असूनही तो परत परत अवैध जुगार व्यवसाय सुरू करत होता. त्याच्या या कृत्यामुळे सामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊन सामाजिक असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी ससाणे याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव तयार करून तो पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्फत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला. आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रस्ताव मंजूर करून आरोपीला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, तसेच पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे आणि महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या प्रभावी कारवाईमुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबद्दल परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Editer sunil thorat



