
जेजुरी (पुणे) : सासवड–जेजुरी महामार्गावर दावणे मळा येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रविवारी (दि. ५) रात्री दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे प्राण पुणे ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार निखिल झगडे (वय २९) हा रस्त्यावर गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याचवेळी रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलीस निरीक्षक निलेश माने हे आपल्या पथकासह तेथून जात असताना त्यांना हा युवक जखमी अवस्थेत दिसला.
वेळेचे महत्त्व ओळखून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ ऍम्ब्युलन्सला संपर्क साधून जखमीला जवळच्या रुग्णालयात हलवले. त्वरित उपचार मिळाल्यामुळे निखिल झगडे याचे प्राण वाचले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या या वेगवान निर्णयक्षमतेचे आणि मानवतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतेच पुणे ग्रामीण पोलीस दलात रुजू झालेल्या माने यांनी कमी कालावधीत दाखवलेली संवेदनशीलता व तत्परता कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.
Editer sunil thorat



