यवत पोलिसांची धडक कारवाई, बोरीऐंदी येथे मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठा जप्त : व्हिडिओ पहा…

यवत (ता. दौंड, जि. पुणे) : (दि.९ ऑक्टोबर २०२५) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरीऐंदी परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठा जप्त करून एक मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात हा साठा ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे छापा…
यवत पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास बोरीऐंदी येथील झुरुंगे वस्ती परिसरात छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी एका घरातून आर.एम.डी. पान मसाला, डायरेक्टर पान मसाला, शॉट 999 तंबाखू, तसेच विमल पान मसाला व तंबाखूचे अनेक बॉक्स असा जवळपास एक कोटीचा मोठा मुद्देमाल साठा केलेल्या ठिकाणी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्राथमिक तपासात हा साठा बाजारात अवैधरित्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…
या कारवाईत नवनाथ रतन झुरुंगे (रा. झुरुंगे वस्ती, बोरीऐंदी, ता. दौंड) या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या घराच्या परिसरातील शेडमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा करण्यात आला होता. नवनाथ रतन झुरुंगे हा इसम घटनास्थळावरून पसार झाला आहे.
महिलांचा सहभाग आणि धक्काबुक्की…
पकडलेल्या साठ्या आधी एका वाहनातून माल वाहतूक झाल्याची माहितीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्यांना पत्रकार यांना काही महिलांनी शिवराळ भाषेत बोलून धक्काबुक्की केल्याचे समोर आले असून, या घटनेत काही महिलांचा सहभाग असल्याचीही दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यामुळे या दिशेनेही तपास सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. आणि आरोपीला अटक अद्याप झालेली नाही.
गुटखा बंदी असूनही अवैध व्यापार सुरूच…
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही सर्रासपणे बाजारपेठांमध्ये गुटखा उपलब्ध होत असल्याने स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून “गुटखा विक्री पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या आशीर्वादानेच सुरू आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात?…
गुटखा सेवनामुळे मुखाचा कर्करोग, पचनसंस्थेचे विकार, तसेच इतर गंभीर आजार होतात. सरकारने गुटखा विक्रीवर बंदी आणूनही अशा प्रकारे साठेबाजी होणे हे गंभीर आणि आरोग्यास धोकादायक असल्याचे सामाजिक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.
पोलीसांचा पुढील तपास चालू…
ही कारवाई यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास विजय कोल्हे करत आहेत. अधिक आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Editer sunil thorat



