पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ‘गोल्डन सियारा पब्लिक स्कूल’चा हातभार ; कदमवाकवस्ती…

कदमवाकवस्ती (पुणे) : अलीकडील पावसामुळे झालेल्या पुरपरिस्थितीने अनेक कुटुंबांचे हाल झाले. विशेषतः शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागला. या पार्श्वभूमीवर समाजातील संवेदनशील घटक पुढे सरसावले असून, लोणी काळभोर येथील ‘गोल्डन सियारा पब्लिक स्कूल’ ने पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रशंसनीय उपक्रम राबवला आहे.
या सामाजिक कार्यात शाळेच्या चेअरमन शैलेश अर्जुन चंद यांनी पुढाकार घेत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात कपडे, बूट, सॉक्स, वह्या, कंपास, शालेय साहित्य, लेखनसामग्री यांचा समावेश होता.
या उपक्रमाची कल्पना शाळेच्या कला शिक्षिका राजश्री कुलकर्णी यांनी मांडली. त्यांनी शाळेचे चेअरमन चंद सर यांच्याशी संपर्क साधत पुरग्रस्त विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत सांगितले. तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत, चंद सर यांनी शाळेच्या वतीने मदत करण्याचा निर्णय घेतला.
यानुसार दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी, ‘गोल्डन सियारा पब्लिक स्कूल’ मध्ये मदत साहित्य सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रीय सेवा समिती — अहिल्या शाखा (लोणी काळभोर) यांच्या लष्कर सेवा प्रमुख संध्या वेदपाठक यांना ही मदत साहित्याची सुपूर्दगी करण्यात आली.
या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिती खणगे, उपमुख्याध्यापक प्रदीप भिसे, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा जागविण्यावरही भर देण्यात आला.
चेअरमन शैलेश अर्जुन चंद यांनी यावेळी सांगितले की,
“शिक्षण ही केवळ पुस्तकी गोष्ट नसून, समाजाप्रती असलेली जबाबदारी शिकवणारी प्रक्रिया आहे. पुरामुळे बाधित विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास पुन्हा सुरू करण्यासाठी आमचा छोटासा हातभार हा मानवतेचा एक भाग आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाबद्दल ‘गोल्डन सियारा पब्लिक स्कूल’चे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेच्या सामाजिक जाणिवेचे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मत स्थानिक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे.
Editer sunil thorat



