
पुणे : राज्यशासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन करून ७ दिवस ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी निर्गमित केला आहे.
या परवानगीनुसार गणेशोत्सव काळात ३० ऑगस्ट, ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर, २ सप्टेंबर, ३ सप्टेंबर, ४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर या एकूण सात दिवसांत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापर करता येणार आहे.
याशिवाय नवरात्री (१ व २ ऑक्टोबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर) आणि वर्षाअखेर (३१ डिसेंबर) यांनाही ध्वनिक्षेपक वापरास परवानगी असेल. विशेष प्रसंगी आवश्यकतेनुसार एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.
तथापि, या परवानगीदरम्यान ध्वनीप्रदूषण नियम २००० आणि ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ यांचे काटेकोर पालन बंधनकारक आहे. ठरवलेल्या झोननुसार मर्यादेपेक्षा अधिक आवाज करता येणार नाही. तसेच शांतता क्षेत्रात ही सूट लागू होणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Editer sunil thorat




