
हडपसर (पुणे) : 15 ऑक्टोबर 2025
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “वाचन प्रेरणा दिन” एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (वाई), ग्रंथालय विभाग, मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्रंथप्रदर्शन, ग्रंथप्रकाशन आणि प्रेरणादायी व्याख्यान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. तुकाराम रोंगटे, इतिहास विभागप्रमुख प्रो. डॉ. श्रद्धा कुंभोजकर, तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे उपस्थित होते.
प्रो. डॉ. तुकाराम रोंगटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
“माणूस ज्ञानाची भूक भागवण्यासाठी वाचन करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महामानवांनी वाचनातूनच आपली दिशा ठरवली. विद्यार्थ्यांनी सातत्याने ग्रंथवाचनाबरोबरच समाजाचेही वाचन करायला हवे.”
इतिहास विभागप्रमुख प्रो. डॉ. श्रद्धा कुंभोजकर म्हणाल्या,
“वाचन आणि लेखन मनाला धार लावतात. समाजातील बदल समजून घेण्यासाठी वाचन अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच वाचनातून संवादकौशल्यही विकसित होते.”
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई येथील प्रतिनिधी रवींद्र घोडराज यांनी सांगितले की,
“अशा उपक्रमांमुळे विश्वकोश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य साध्य होते. वाचन माणसाला प्रेरणा देण्यासोबत रोजगाराच्या संधींचेही दार उघडते.”
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर काकडे यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना सांगितले,
“डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन हे वाचन, परिश्रम आणि चिकाटीचे आदर्श उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षण वाचनासाठी उपयोगात आणावा.”
या प्रसंगी मराठी विभागातील डॉ. संदीप वाकडे लिखित ‘मनोमय युरोप-अमेरिका : एक आकलन’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ग्रंथालय विभागाने दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरवले. सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांचा यशाबद्दल सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्रा. राधाकिसन मुठे यांनी केले, पाहुण्यांची ओळख उपप्राचार्य डॉ. दिनकर मुरकुटे यांनी करून दिली. आभार प्रदर्शन प्रा. शोभा कोरडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. छाया सकटे यांनी केले.
या वेळी डॉ. ज्योती किरवे, डॉ. एकनाथ मुढे, प्रा. संजय अहिवळे, डॉ. संजय जगताप, तसेच प्राध्यापक, स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Editer sunil thorat








