
हडपसर (पुणे) : “परीक्षेत अयशस्वी झालेला विद्यार्थीही आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. यश हे केवळ गुणांमध्ये नव्हे तर आनंदात मोजता आले पाहिजे. आनंदी आयुष्य जगण्यासाठी वाचन, साहित्य, कला यांसारखे छंद जोपासावेत. साहित्य वाचनाने माणूस समृद्ध होतो,” असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी व लेखक अनिल गुंजाळ यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब मगर महाविद्यालयात माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेअंतर्गत “आनंदात जगुया” या विषयावर अनिल गुंजाळ यांचे प्रेरणादायी व्याख्यान तसेच ग्रंथालय विभागातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
गुंजाळ यांनी या प्रसंगी अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, व्यसन, जातपात आणि आत्महत्या यापासून दूर राहण्याची ‘पंचसूत्री संकल्पना’ मांडली. समाजातील सकारात्मक बदलासाठी वाचन आणि विवेक यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, प्रा. गजाला सय्यद, केंद्र कार्यवाह डॉ. नाना झगडे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. मंजुषा भोसले, प्रा. हेमलता धुमाळ, प्रा. व्ही. व्ही. शिंदे, प्रा. व्ही. पी. वाघमारे, प्रा. एस. ए. मीर, प्रा. अर्चना जाधव, प्रा. मनीषा पंडित, प्रा. व्ही. व्ही. खळदकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजाला सय्यद यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. मनीषा पंडित यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. अर्चना जाधव यांनी केले तर आभार प्रा. व्ही. व्ही. शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन केंद्र कार्यवाह डॉ. नाना झगडे यांनी केले.
Editer sunil thorat






