राजकीयसामाजिक

लोणी काळभोर SC प्रवर्गासाठी आरक्षित; महिलांना जिल्हा परिषदेत संधी, तिन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू…

कदमवाकवस्ती–लोणी काळभोर–वडकी परिसरासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांची आरक्षण सोडत जाहीर!

कदमवाकवस्ती (ता.हवेली) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नुकतीच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनंतर कदमवाकवस्ती–लोणी काळभोर–वडकी या गणातील जिल्हा परिषद सदस्य पद अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे महिलांना नेतृत्वाची नवी संधी उपलब्ध झाली असून, राजकीय समीकरणांमध्ये मोठा फेरबदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकसंख्या व आरक्षणाचे स्वरूप…

या गणात तीन प्रमुख ग्रामपंचायती — कदमवाकवस्ती, लोणी काळभोर आणि वडकी — यांचा समावेश आहे. अंदाजे मतदार कदमवाकवस्तीची लोकसंख्या सुमारे 19,570, लोणी काळभोरची 22,000, आणि वडकीची सुमारे 7,000 असतील अशी माहिती मिळत आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार,

पंचायत समिती सदस्यपदासाठी कदमवाकवस्ती व लोणी काळभोर ग्रामपंचायतीतील वार्ड क्र. 3 व 4 हे अनुसूचित जाती (SC) पुरुष आरक्षित,

तर लोणी काळभोर वार्ड क्र. 1, 2, 5, 6 तसेच वडकी गावाचा समावेश ओबीसी महिला प्रवर्गात करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सदस्यपदासाठी संपूर्ण कदमवाकवस्ती–लोणी काळभोर–वडकी गण अनुसूचित जाती (SC) महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे.

या आरक्षणामुळे स्थानिक पातळीवर महिला नेतृत्वाला बळ मिळणार असले तरी अनेक इच्छुक पुरुष उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर चर्चा आणि गटबाजीला ऊत आला आहे.

पक्षांची रणनीती : महायुती विरुद्ध स्वबळ…

या आरक्षणाच्या घोषणेनंतर तिन्ही प्रमुख पक्ष — शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) — यांनी आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू केली आहे.

शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

“शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे. आम्ही गेल्या काही वर्षांपासून समाजसेवा आणि विकासाच्या कामांमुळे लोकांच्या संपर्कात आहोत. जर अन्याय झाला किंवा जागावाटपात गैरसोय झाली, तर तिन्ही ठिकाणी स्वबळावर उमेदवार उभे करून शिवसेना विजयी होईल,” असे त्यांनी सांगितले.

भाजपचे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रविण काळभोर यांनी सांगितले,

“भाजपची संघटना हवेली तालुक्यात मजबूत आहे. ज्या ठिकाणी आपला निष्ठावान आणि कार्यक्षम कार्यकर्ता आहे, त्याला प्राधान्य दिले जाईल. तसेच महायुतीच्या चौकटीत राहून मित्र पक्षांसोबत समन्वय साधत निवडणूक लढवली जाईल. आमचे ध्येय केवळ विजय नसून, विकास आणि स्थैर्य आहे.”

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी अध्यक्ष नंदू काळभोर म्हणाले,

“महायुतीत जर जागावाटप ठरले, तर आम्ही प्रामाणिकपणे एकत्र काम करू. पण स्वतंत्र लढाई ठरल्यास आमचे कार्यकर्ते विकासाच्या बळावर नक्की विजय मिळवतील. कदमवाकवस्ती–लोणी काळभोर–वडकी परिसरातील लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास कायम ठेवू.”

स्थानिक पातळीवरील हालचाली आणि चर्चेचा केंद्रबिंदू

या आरक्षणामुळे परिसरात राजकीय तापमान झपाट्याने वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार आता आरक्षित प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांशी संपर्क साधत आहेत. काही गटबाजीचे संकेत दिसू लागले असून, कार्यकर्त्यांमध्ये “कोण कुणाच्या पाठीशी उभा राहील?” या प्रश्नावर चर्चा रंगली आहे.

स्थानिक पातळीवर “फायनल होईपर्यंत काहीही बदलू शकते” अशी चर्चा सुरू आहे. काही कार्यकर्ते पक्षांतराच्या विचारात असल्याची कुजबुज सुरू आहे. काही जणांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचीही तयारी केली आहे. येणाऱ्या काळात कोण उमेदवार आहे. आणि कुठला पक्ष तिकीट देतो. कोण कोणाच्या पक्षात पक्षांतर करते ते येणारा काळच ठरवेल.

कभी खुशी, कभी गम’ असा राजकीय माहोल…

आरक्षण जाहीर झाल्यापासून कदमवाकवस्ती परिसरात “कभी खुशी, कभी गम” असा माहोल दिसत आहे. काहींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असताना, काहींना निराशेचा धक्का बसला आहे. महिला आरक्षणामुळे स्थानिक पातळीवर नवीन नेतृत्व उदयास येईल, ही सकारात्मक बाजू असली तरी काही अनुभवी नेत्यांना या वेळी संधी मिळणे कठीण आहे.

राजकीय नेत्यांच्या पत्नी, भगिनी, मुली यांची नावे संभाव्य उमेदवारांच्या चर्चेत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत नवे चेहरे आणि नवी समीकरणे दिसतील, हे निश्चित.

आगामी निवडणुकीचा दिशादर्शक टप्पा…

हवेली तालुक्यातील या गणात राजकीय वातावरण पूर्वीपासूनच चुरशीचे राहिले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही पातळ्यांवर विकासकामे, राजकीय प्रभाव आणि जातीय समीकरणे निर्णायक ठरणार आहेत.
तिन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून, संघटन पातळीवर आखणी सुरू झाली आहे.

या आरक्षणामुळे केवळ पदांचे स्वरूपच बदलले नाही, तर राजकीय समतोलही ढवळून निघाला आहे. पुढील काही दिवसांत कोणत्या पक्षाची चाल प्रभावी ठरते आणि कोणता उमेदवार “कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, वडकीचा चेहरा” म्हणून पुढे येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

थोडक्यात आरक्षणाचे चित्रण :

पंचायत समिती अनुसूचित जाती (SC) पुरुष वार्ड क्र. 3 व 4 – कदमवाकवस्ती व लोणी काळभोर
पंचायत समिती ओबीसी महिला वार्ड क्र. 1, 2, 5, 6 व वडकी गाव
जिल्हा परिषद अनुसूचित जाती (SC) महिला संपूर्ण गण : कदमवाकवस्ती–लोणी काळभोर–वडकी

या आरक्षणामुळे राजकीय चित्रात नव्या उलथापालथींची चाहूल लागली आहे. महिलांना संधी मिळाल्याने समाजात प्रतिनिधित्व वाढण्याची सकारात्मक बाजू दिसत आहे. मात्र पारंपरिक राजकारण्यांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची परीक्षा ठरणार आहे. हवेली तालुक्यातील जनतेचे लक्ष आता या आरक्षित गणाकडे लागले असून, “राजकारणात दिवे लागलेत, पण कोण जळणार आणि कोण उजळणार?” हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??