शिवाजीनगर न्यायालयाच्या इमारतीवरून ६१ वर्षीय इसमाची आत्महत्या! न्याय न मिळाल्याने टोकाचे पाऊल…

पुणे : (दि. 15 ऑक्टोबर) शिवाजीनगर न्यायालयाच्या नवीन इमारतीवरून ६१ वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवारी) दुपारी घडली. ही घटना दुपारी सुमारे 11.40 ते 12.10 या वेळेत घडली असून मृत इसमाचे नाव नामदेव यशवंत जाधव (वय ६१, रा. वडकी, हडपसर) असे आहे.
या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू क्रमांक 54/25 अशी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या टेरेसवरून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांचे मार्शल व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी अवस्थेतील जाधव यांना तात्काळ ससून रुग्णालयात हलवले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी पोलिसांना मृत व्यक्तीजवळून चिठ्ठी (सुसाइड नोट) तसेच आधारकार्ड मिळाले. चिठ्ठीमध्ये जाधव यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात कौटुंबिक वादासंबंधी काही बाबी नमूद केल्या आहेत.
सदर चिठ्ठीनुसार, जाधव यांनी नमूद केले आहे की —
त्यांच्या वडिलांनी त्यांची संमती न घेता कौटुंबिक जागा विक्री केली होती. त्या संदर्भात त्यांनी 1997 पासून न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र न्यायालयीन प्रक्रियेत त्यांना न्याय मिळालेला नव्हता. तसेच वडिलांनी इतर काही जागा त्यांना दिल्याचे सांगितले असले तरी त्या जागेची कागदपत्रे त्यांच्या नावावर झालेली नव्हती.
त्याचप्रमाणे भावाने संबंधित जागेवर बांधकाम केले असून त्या बांधकामावर जाधव यांनी स्थगिती (स्टे) मिळवली होती; परंतु ती नंतर रद्द झाली. या सर्व गोष्टींमुळे ते तीव्र नैराश्यात होते, आणि अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.
पोलिसांनी मृत व्यक्तीच्या मुलाशी संपर्क साधून त्याचा जबाब नोंदवला असून, आत्महत्येच्या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करत आहेत.
Editer sunil thorat



