शिकापुर पोलिसांची मोठी कारवाई : पाच सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार…

साहेबराव आव्हाळे
शिरूर (पुणे) : शिकापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सतत गुन्हे करणाऱ्या पाच सराईत आरोपींविरुद्ध शिकापुर पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
सदर आदेश पूनम अहिरे, उपविभागीय दंडाधिकारी, शिरूर तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केले आहेत.
या आदेशानुसार संबंधित आरोपींना संपूर्ण पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच सोलापुर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुके या क्षेत्रांतून हद्दपार करण्यात आले आहे.
ही कारवाई शिकापुर पोलिसांच्या सततच्या प्रयत्नांचा व कठोर भूमिकेचा परिणाम मानली जात आहे.
हद्दपार करण्यात आलेले सराईत आरोपी…
1. गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर – रा. खंडोबाची आळी, सणसवाडी, ता. शिरूर
2. निखील विजय पलांडे – रा. मुखई, गवंडीवस्ती, ता. शिरूर
3. बाबुलाल अरूण भुजबळ – रा. चंद्रा सोसायटी, तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर
4. प्रसाद प्रल्हाद ढगे – रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर
5. सागर सुनिल वर्षे – रा. करंदी, ता. शिरूर
या सर्व आरोपींनी शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध गुन्हे केल्याची नोंद शिकापुर पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर आहे. वारंवार गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी व कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलिसांनी ही तडीपार कारवाई केली आहे.
पोलिस अधीक्षकांचे मार्गदर्शन…
ही संपूर्ण कारवाई संदिपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक (सो. पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांनी शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना गुन्हेगारांविरुद्ध कडक प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलिसांनी पाचही आरोपींचा तपशीलवार प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडे पाठवला होता.
कारवाईत सहभागी अधिकारी व पथक…
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार विकास पाटील, रोहीदास पारखे यांच्यासह सहा. पो. फौजदार महेश बनकर, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, जयराज देवकर, शिवाजी चितारे, अमोल नलगे, प्रतिक जगताप, नारायण वाळके, राम जाधव या कर्मचाऱ्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
ही मोहीम अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थागुशा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या देखरेखीखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांचे आवाहन…
हद्दपार आरोपींना आदेश लागू झाल्यानंतर संबंधित जिल्हा व तालुक्यातून बाहेर काढण्यात आले असून, जर हे इसम हद्दीत दिसून आले तर नागरिकांनी तात्काळ शिकापुर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले आहे.
उद्देश, कायदा आणि सुव्यवस्था राखणे…
या कारवाईचा उद्देश म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा धाक निर्माण करणे, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आणि सामान्य नागरिकांना निर्भय वातावरण देणे हा आहे. शिकापुर पोलिसांची ही कारवाई नागरिकांकडून कौतुकास्पद ठरत असून, परिसरात कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे.
Editer sunil thorat



