पुणे : चऱ्होली येथील महेश शेजवळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पुणे जिल्हा ग्राहक न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्रला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
तक्रारदार हे बँक ऑफ महाराष्ट्र विश्रांतवाडी शाखेचे खातेदार असून त्यांनी जानेवारी २०१७ मध्ये आर्थिक निर्बंध काळात पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत येथील एटीएम मशिन मधुन दहा हजार रुपये इतकी रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे मिळाले नाहीत परंतु त्यांच्या बँक खात्यामधून दहा हजार रुपये वजा झाले.
रिजर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकाप्रमाणे बॅंकने कामकाजाच्या बारा दिवसात वजा झालेली रक्कम ग्राहकाच्या खात्यात जमा करणे गरजेचे असते. परंतु तसे न झाल्याने तक्रारदार यांनी बँकेत तक्रार दाखल केली. वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर बॅंकेकडून यावर, ‘ए.टी.एम. मध्ये कोणतीही जास्तीची रोकड किंवा फरक आढळला नाही.’ असे उत्तर मिळाले.
नाईलाजास्तव तक्रारदार यांनी पुणे ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचेकडे रितसर तक्रार दाखल करून नुकसान भरपाईची मागणी केली. पुणे ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बँक ऑफ महाराष्ट्र विश्रांतवाडी शाखा यांना २० जानेवारी २०१७ ते २० डिसेंबर २०१७ अशा एकूण ३३५ दिवसांचे शंभर रुपये प्रति दिवस याप्रमाणे रक्कम रु. ३३,५००/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रू. ५०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रू. १०००/- असे एकूण ३९,५००/- भरपाई दयावेत असा आदेश दिला. आयोगातर्फे अध्यक्ष अनिल बी. जवळेकर, सदस्या सरीता एन.पाटील, व शुभांगी जे. दुनाखे यांनी काम पाहिले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा