मतदार यादी स्वच्छ करा नाहीतर निवडणुका घेऊन दाखवा ; राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला थेट इशारा…

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील गंभीर गोंधळावरून निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलं आहे.
“जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा,” असं खुले आव्हान त्यांनी दिलं.
मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र टीका केली.
ते म्हणाले, “सत्ताधारी पक्षाचे आमदारसुद्धा सांगत आहेत की मतदार याद्यांमध्ये बोगस नावे भरली गेली आहेत. मग या निवडणुका नेमक्या कोणासाठी होत आहेत? गेली १०-१५ वर्षं हेच घोळ सुरू आहेत. उन्हात उभं राहून मतदान करणाऱ्या नागरिकांच्या मताला किंमत नसेल, तर निवडणुका कशासाठी?”
राज ठाकरेंनी अडाणी-अंबानी समूहांवर आणि सत्ताधाऱ्यांवरही थेट आरोप केले. ते म्हणाले, “राज्यातील शहरं अडाणी-अंबानींना देण्यासाठी हे सर्व डावपेच रचले जात आहेत. वीज, रस्ते, टनेल — सगळीकडे त्यांचाच हस्तक्षेप आहे. हे सगळं उद्योगपतींसाठी चाललेलं आहे, जनतेसाठी नाही. मराठी माणसं त्यांच्यासाठी दलाल बनली आहेत, आणि केंद्र-राज्य दोन्ही त्यांच्या हातात आहेत. आता पालिका आणि जिल्हा परिषदाही त्यांच्या ताब्यात द्यायच्या आहेत. हे सगळं एक नियोजनबद्ध खेळ आहे.”
राज ठाकरेंनी मुंबईवरूनही गंभीर विधान केलं.
“गुजरातला मुंबई हवी होती, हे आजचं नाही तर जुनं षडयंत्र आहे. वल्लभभाई पटेल यांनीही मुंबई गुजरातला देण्याची भूमिका घेतली होती. आज पुन्हा तसंच होत आहे — महाराष्ट्राचं अस्तित्व जमीन गमावण्यात आहे,” असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “सर्वांना विनंती आहे की सतर्क राहा. एका एका घरात शेकडो बोगस मतदार भरले जात आहेत. सर्व यादी प्रमुखांनी घराघरात जाऊन तपासणी करावी. जोपर्यंत मतदार यादी स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. नाहीतर निवडणुका घेऊनच दाखवा!”
राज ठाकरेंच्या या तीव्र वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून, निवडणूक आयोगावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी मनसेने घेतलेली ही आक्रमक भूमिका राजकारणात नवी चर्चा पेटवणारी ठरत आहे.
Editer sunil thorat



