
थेऊर (हवेली) : पावसाच्या तडाख्याने शेती व घरांचे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या रुकेवस्ती, थेऊर परिसरातील २८ बाधित कुटुंबांना दिवाळीच्या निमित्ताने लोणी काळभोर पोलिसांकडून अन्नधान्य किट व मिठाईचे वाटप करण्यात आले. हा अनोखा आणि मनाला स्पर्श करणारा सामाजिक उपक्रम पोलीसांनी स्वतःच्या पुढाकाराने राबवून “खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद म्हणजे मानवतेचा प्रकाश” असा संदेश दिला.
पोलिस पाटील रेश्मा संतोष कांबळे यांच्या उपस्थितीत हा मदतकार्य उपक्रम पार पडला. पावसामुळे शेत व घरांचे मोठे नुकसान झाल्याने अनेक कुटुंबांवर नैराश्याचे सावट असताना, लोणी काळभोर पोलिसांनी कुठल्याही शासकीय आदेशाविना स्वतंत्रपणे पुढाकार घेत, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीपूर्वीचे हास्य आणले.
सामाजिक संवेदनशीलतेचा उत्तम नमुना…
हा उपक्रम पोलीस हवालदार राणी खामकर आणि उषा थोरात यांच्या संकल्पनेतून, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे म्हणाले…
“शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन दिवाळीचा आनंद त्यांच्या घराघरांत पोहोचवणे हा आमचा हेतू आहे. लोकांशी जवळीक राखणे हेच पोलीसांचे खरे बळ आहे.”
सहभागी अधिकारी व कर्मचारी…
या उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, सर्जेराव बोबडे, तसेच हवालदार रवी आहेर, संदीप जोगदंड, महेश चव्हाण, विजय जाधव, प्रदीप शिरसागर, बापू वाघमोडे, मंगेश नानापुरे, महिला हवालदार राणी खामकर, उषा थोरात आणि संदीप धुमाळ यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
मदतकार्याचा मानवी चेहरा…
या उपक्रमावेळी महादेव कांबळे, राहुल कांबळे, रवी कांबळे, ताराचंद बोडरे यांसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. एकूण २८ कुटुंबांना अन्नधान्य किट आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. “लोणी काळभोर पोलिसांनी दाखवलेला संवेदनशीलतेचा चेहरा हा संपूर्ण पोलिस दलासाठी प्रेरणादायी आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.
जनतेचा विश्वास वाढवणारा पोलिसांच्या उपक्रमाने लोणी काळभोर पोलीस स्टेशनने समाजाशी असलेली संवेदनशील बांधिलकी अधोरेखित केली असून, “अशा अनोख्या सामाजिक पुढाकारातून पोलिसांच्या जनसंपर्कात उबदारपणा आणि विश्वास वाढतो,” अशी जनतेची प्रतिक्रिया उमटली.
राजकीय पुढाऱ्यांचा अभाव चर्चेचा विषय…
दरम्यान, या पावसाने बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणताही राजकीय पुढारी, आमदार किंवा खासदार उपस्थित नव्हता, ही बाब स्थानिक चर्चेचा मुख्य विषय ठरली. “राजकीय लोक अनुपस्थित, पण पोलिसांनी दाखवली खरी सेवा भावना,” असे ग्रामस्थांचे म्हणणे होते.
Editer sunil thorat





