
पुणे : काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी महिलेशी गैरवर्तन आणि अपमानास्पद वर्तन केल्याच्या आरोपांवरून सामाजिक कार्यकर्त्या अनिता गोरे यांनी परिमंडळ ५ चे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांना निवेदन देत तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अनिता गोरे या “आनंद आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था” तसेच “रिपब्लिकन भीम क्रांती सेना” यांच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संस्थेची सभासद रसिका कुंचले आणि तिची अल्पवयीन मुलगी दिव्या कुंचले (वय १५ वर्षे, इ. ९वी) यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने चोरीचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी मदतीसाठी अनिता गोरे पोलीस ठाण्यात गेल्या असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी अपमानास्पद भाषेत बोलून महिलांचा अवमान केल्याचे नमूद केले आहे.
निवेदनातील आरोप…
“मानसिंग पाटील यांनी माझे म्हणणे ऐकून न घेता महिलेला हिणवणारी आणि अश्लील भाषेत टिप्पणी केली. अल्पवयीन मुलीला घाबरवून मानसिक दबाव आणला. काही कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणीही झाल्याचे निदर्शनास आले. अशा वर्तनाने पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते. म्हणूनच तात्काळ सखोल चौकशी करून मानसिंग पाटील यांना निलंबित करण्यात यावे; अन्यथा पुढील काळात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.”
तसेच अनिता गोरे यांनी पुढे इशारा दिला की…
“जर संबंधित अधिकाऱ्यावर न्याय्य कारवाई झाली नाही, तर संघटनेच्या वतीने भविष्यात मोठ्या प्रमाणावर रास्तारोको आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
अनिता गोरे यांची प्रतिक्रिया…
“वरील घटनेची योग्य चौकशी न झाल्याने मी माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता मला अपमानित करून असभ्य वर्तन करण्यात आले. या प्रकरणी मी परिमंडळ ५ चे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांना निवेदन देऊन मानसिंग पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.” — अनिता गोरे, सामाजिक कार्यकर्त्या व पुणे जिल्हा महिला अध्यक्षा, रिपब्लिकन भीम क्रांती सेना
पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची प्रतिक्रिया…
“सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणी सुरू असून तपासादरम्यान संपूर्ण तथ्य समोर येईल.”
— मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन
उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची प्रतिक्रिया…
“संपूर्ण माहितीच्या अनुषंगाने योग्य तपास करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.”
— डॉ. राजकुमार शिंदे, उपायुक्त परिमंडळ ५, पुणे
हल्लाबोल आंदोलन…
या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन भीम क्रांती सेना अंतर्गत दलित बहुजन सामाजिक सेवा संस्थांच्या वतीने हल्लाबोल धरणे आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव, मातंग एकता आंदोलन पुणे शहर अध्यक्ष दिगंबर जोगदंड, रिपब्लिकन भीम क्रांती सेनेचे अध्यक्ष महेंद्र जैन जांगडे, अनिता गोरे, कौशल्या इजगज, कविताताई वाघमारे, मंगल सूर्यवंशी, सारिका साळवी, ज्योती चौव्हाण, अंजना देडे, सुनिता केदारी तसेच घरेलू कामगार प्रतिनिधी रसिका कुंचले यांची उपस्थिती होती.
या आंदोलनात सुमारे ३० घरेलू कामगार महिलांचा सहभाग होता. रसिका कुंचले यांच्या मुलगी दिव्या हिच्यावर मालकीणीने हिरे आणि सोन्याच्या बांगड्या चोरल्याचा खोटा आरोप लावला होता. या प्रकरणाची विचारणा करण्यासाठी कार्यकर्ते काळेपडळ पोलीस स्टेशनला गेले असता, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी अपमानास्पद वागणूक देऊन उद्धट शब्दांत बोलत आंदोलनकर्त्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला.
या अन्यायाच्या विरोधात डीसीपी परिमंडळ ५, फातिमानगर येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
Editer sunil thorat






