
पुणे : दिवाळीनिमित्त सुट्टीसाठी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची शनिवारी पुण्यात मोठी झुंबड उडाली. राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, रेल्वे तसेच विमान प्रवासासाठी मोठी गर्दी झाली असून, परिणामी पुणे आणि परिसरातील प्रमुख महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
शनिवारी सकाळपासूनच शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड एसटी स्थानके तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली. रेल्वे तिकिटांसाठी प्रतीक्षा यादी वाढली असून अनेक प्रवासी हडपसर आणि खडकी येथून सुटणाऱ्या गाड्यांकडे वळले आहेत.
रेल्वेकडून ९०० अतिरिक्त फेऱ्या…
मध्य रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून २८ विशेष गाड्यांद्वारे तब्बल ९०० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या लखनौ, दिल्ली, दानापूर, गोरखपूर, नागपूर, लातूर, रत्नागिरी, अजनी आदी ठिकाणांसाठी सोडण्यात येणार आहेत.
गर्दी कमी करण्यासाठी काही गाड्या हडपसर आणि खडकी टर्मिनलवरून सुटण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाकडून ५८९ जादा गाड्या…
राज्य परिवहन महामंडळानेही मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. शिवाजीनगर, स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड स्थानकातून ५८९ जादा बस गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बस बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशीव, जळगाव, नाशिक, धुळे, नागपूर, अमरावती, सातारा, कोल्हापूर आणि महाबळेश्वर अशा विविध जिल्ह्यांच्या मार्गावर धावत आहेत.
महामार्गांवर वाहनांची गर्दी…
एसटी, रेल्वे आणि खासगी बस प्रवासाबरोबरच अनेकांनी खासगी वाहनांनी गावाकडे जाण्याचा पर्याय निवडल्याने शनिवारी महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर, सातारा रस्ता, पुणे-सोलापूर महामार्गावर उरूळीकांचन-लोणी परिसर, तसेच पुणे-अहिल्यानगर मार्गावर येरवडा, खराडी, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव या भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
विमान प्रवासालाही मागणी…
रेल्वे आणि एसटी व्यतिरिक्त अनेकांनी विमान प्रवासाचाही पर्याय निवडला आहे. मात्र, विमान तिकिटांचे दर दुप्पट झाल्यानेही प्रवाशांची मागणी कायम आहे, असे विमानतळ सूत्रांनी सांगितले. पुणे विमानतळावर दिवसभर प्रवाशांची लगबग दिसून आली.
खासगी बस कंपन्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन…
खासगी बस कंपन्यांनी ठरवून दिलेल्या दरानुसारच तिकीट आकारावे, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
“जास्त रक्कमेची मागणी झाल्यास प्रवाशांनी ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा rto.12-mh@gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. तसेच तिकीटाचे छायाचित्र पाठवावे,” अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.
Editer sunil thorat



