पुणे (हडपसर) : साधना विद्यालयाचे विद्यार्थी कला, क्रीडा, अभ्यास व स्पर्धा परीक्षेत नेहमीच उत्तम यश मिळवतात. निती आयोग भारत सरकार व अटल इनोव्हेशन मिशन पुरस्कृत लर्निग लिंक फाउंडेशन आणि CGI आयोजित “स्टेम स्पार्क २५” ही अटल टिंकरिंग लॅब मधील विद्यार्थ्यासाठीची राज्यस्तरीय स्पर्धा घणसोली, नवी मुंबई येथे नुकतीच पार पडली.
या स्पर्धेत साधना विद्यालय, हडपसर येथील अटल टिंकरिंग लॅब (ATL) मधील ३ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत सहभागी एकूण ११० संघापैकी टॉप १० संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये साधना विद्यालयातील दोन संघांनी टॉप १० मध्ये येण्याचा मान मिळवला.
विद्यालयातील विद्यार्थी अद्वैत पायगुडे व हर्षवर्धन शेलार यांनी सादर केलेल्या ‘स्मार्ट व्हीलचेअर’ या प्रोजेक्टला तृतीय क्रमांकाचे तर ज्ञानेश्वर शेळके व संचित जगताप यांच्या ‘स्मार्ट सेफ्टी सलाईन’ या प्रोजेक्टला चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
याशिवाय श्रावणी इंगळे व समीक्षा म्हेत्रे यांनाही उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील अटल इनचार्ज मुराद तांबोळी व सोमनाथ धालवडे यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, पर्यवेक्षिका माधुरी राऊत यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा