साताऱ्यात धक्कादायक घटना! महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिली सुसाईड नोट, PSI वर अत्याचाराचा गंभीर आरोप

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या करून जीवनयात्रेला पूर्णविराम दिला असून या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विशेष म्हणजे, मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली असून त्यात त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आणि हवालदार प्रशांत बनकर याच्यावर मानसिक त्रासाचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे आरोग्य व पोलीस विभागात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर या फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी फलटण शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये आयुष्य संपवले. त्यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये “गोपाल बदनेने चार वेळा अत्याचार केला आणि प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिला” असे नमूद आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने सातारा पोलिस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आणि दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. आयोगाने हेही स्पष्ट केले की, डॉक्टरने यापूर्वी तक्रार केली असल्यास त्यावर कारवाई का झाली नाही, याचीही चौकशी केली जाईल. दरम्यान, फलटण सिटी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2)(N) आणि 108 नुसार गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेसाठी शोधपथक रवाना केले आहे.
Editer sunil thorat



