ओला-उबरचा बाजार उठणार…! महाराष्ट्रासह चार राज्यांत सुरू होणार ‘भारत टॅक्सी’; चालक होतील सह-मालक, नो कमिशन मॉडेल, प्रवाशांना पारदर्शक दर…

नवी दिल्ली : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरचा एकछत्री कारभार संपवण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. देशात लवकरच ‘भारत टॅक्सी’ (Bharat Taxi) ही नवी सहकारी टॅक्सी सेवा सुरू होत असून ती ‘मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह टॅक्सी कोऑपरेटिव्ह लिमिटेड’ अंतर्गत राबवली जाणार आहे.
ही देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा ठरणार असून तिचा पायलट टप्पा दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांत सुरू होईल. या मॉडेलमध्ये चालक हे केवळ नोकर नसून सहकारी संस्थेचे सह-मालक असतील, ज्यामुळे टॅक्सी सेवेतून होणारा नफा थेट चालकांपर्यंत पोहोचणार आहे.
खासगी कंपन्यांप्रमाणे चालकांकडून कोणतेही जास्त कमिशन आकारले जाणार नाही, त्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे. ओला-उबरसारख्या ॲग्रीगेटर्सकडून घेतल्या जाणाऱ्या २५ ते ३० टक्क्यांच्या कमिशन कपातीमुळे चालकांना भेडसावणारी आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. या ॲपमध्ये सणासुदीच्या काळात किंवा जास्त मागणी असताना आकारले जाणारे अवाजवी ‘सर्ज प्राइसिंग’ लागू राहणार नाही, त्यामुळे प्रवाशांना पारदर्शक आणि परवडणाऱ्या दरात टॅक्सी सेवा मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचे अधिकृत भांडवल उभारण्यात आले असून या योजनामागे देशातील आठ प्रमुख सहकारी संस्थांचे पाठबळ आहे. यात अमूल, इफको, नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NCDC) यांसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे. सहकारी टॅक्सी संस्थेच्या अध्यक्षपदी अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांची निवड करण्यात आली आहे. सहकार मंत्रालयाच्या सूत्रांनुसार या वर्षाअखेरीस म्हणजेच डिसेंबरपर्यंत ‘भारत टॅक्सी’ ॲपचे राष्ट्रीय स्तरावर लोकार्पण होण्याची शक्यता आहे. ‘भारत टॅक्सी’ हे केवळ एक ॲप नसून चालकांना आर्थिक स्वावलंबन देणारा आणि प्रवाशांना परवडणाऱ्या दरात विश्वासार्ह सेवा देणारा सहकार क्षेत्रातील ऐतिहासिक प्रयोग ठरणार आहे. या योजनेमुळे देशभरातील लाखो टॅक्सीचालकांना स्थैर्य, मालकीहक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाचा नवा मार्ग उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Editer sunil thorat



