लोणी काळभोर पोलिसांतर्फे ‘एकता दौड’चे उत्साहात आयोजन, पुरुष गटात गोविंद खलसे तर महिला गटात भाग्यश्री घुले प्रथम…

कदमवाकवस्ती (ता. हवेली) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनानिमित्त लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने “एकता दौड”चे आयोजन करण्यात आले. या ३ किलोमीटरच्या एकता दौडीत पुरुष गटात गोविंद खलसे तर महिला गटात भाग्यश्री घुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५ यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता ही दौड पार पडली. सुमारे ९८० जणांनी सहभाग नोंदवला असून त्यात ६७२ पुरुष व ३०८ महिला सहभागी झाल्या होत्या. ही दौड श्रीदत्त मंदिर चौकातून सुरू होऊन रायवाडी रोड, अंबरनाथ मंदिर, पाषाणकर बाग चौक मार्गे पालखी मैदान कदमवाकवस्ती येथे समाप्त झाली.
या एकता दौडीत ज्येष्ठ नागरिक, पूर्व हवेली असोसिएशनचे डॉक्टर्स, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, उपमहाराष्ट्र केसरी पै. भरत मस्के, मुंबई महापौर केसरी पै. दत्तात्रय काळे, नॅशनल बॉक्सर चॅम्पियन सृष्टी जाधव, सरपंच नागेश काळभोर, पत्रकार, बचत गटांच्या महिला, विद्यार्थी तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुरुष गटात प्रथम गोविंद खलसे, द्वितीय वैभव लाड व तृतीय योगेश बोरोळे तर महिला गटात प्रथम भाग्यश्री घुले, द्वितीय प्रेरणा लोंढे व तृतीय ज्ञानेश्वरी बोरावके यांनी स्थान पटकावले. विजेत्यांचा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या हस्ते मेडल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम सादर केला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सरदार पटेल यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील यांनी मानले.
इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर लोणी काळभोर पोलीस प्रशासनाच्या वतीने अशा स्वरूपाचा उपक्रम राबवण्यात आला असून या माध्यमातून राष्ट्रीय एकता, सार्वभौमता आणि जातीय सलोखा यांचा उत्कृष्ट संदेश देण्यात आला. नागरिकांकडून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
Editer sunil thorat
 
				 
					






 
					 
						


