पै. किरण साकोरे परिवाराच्या हस्ते गंगा आरती; वाराणसीत पुणेकर यात्रेकरूंच्या गर्दीने घाट परिसर दुमदुमला
काशी-विश्वेश्वरांच्या दर्शनाने लोणीकंद-पेरणे गटातील यात्रेकरू भाविक मंत्रमुग्ध!

वाराणसी (काशी) : लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील सर्व गावांतील भक्ती भाविकांसाठी प्रदिपदादा कंद युवा मंच व पै. किरण साकोरे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित काशी विश्वेश्वर – अयोध्या देवदर्शन यात्रा भक्तीभावाने पार पडली. या यात्रेदरम्यान पुण्यातील यात्रेकरू भाविकांनी वाराणसी येथे काशी विश्वेश्वरांचे दर्शन घेत भक्तिभावाने मंत्रमुग्ध अनुभव घेतला.
भक्तीमय वातावरणात पै. किरण साकोरे यांच्या परिवाराच्या हस्ते माता गंगेची भव्य आरती पार पडली. आरतीदरम्यान गंगेच्या घाटावर ‘हर हर महादेव’च्या गजरांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. यात्रेकरू भाविकांनी विश्वेश्वरांचे दर्शन घेत, गंगा आरतीचा दैवी आनंद घेतला. वाराणसीतील गंगा घाट आणि विश्वेश्वर मंदिर परिसरात पुणेकरांच्या उपस्थितीने भक्तीभावाचा महासागर उसळल्याचे दृश्य अनुभवास मिळाले.
पै. किरण साकोरे यांच्या परिवाराने विश्वेश्वरांची पूजा केली, तर गंगा घाटावर माता गंगेची आरती करून यात्रेचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात झाला. सर्व यात्रेकरूंना मंदिरात प्रत्यक्ष दर्शन घेण्याची सुव्यवस्था करण्यात आली होती. यात्रेकरूंनी संपूर्ण भक्तीभावाने दर्शन घेतले असून, कोणत्याही प्रकारची अडचण न येता प्रवास सुखद पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.
ही यात्रा शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व भाजप क्रीडा आघाडी प्रदेशाध्यक्ष पै. संदीप भोंडवे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, हवेली पं.स. उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, कृ.उ.बाजार समिती उपसभापती रविंद्र कंद, जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर, हवेली पं.स.च्या उपसभापती संजीवनी कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
“काशी विश्वेश्वरांच्या आशीर्वादाने लोणीकंद-पेरणे गटाचा सर्वांगीण विकास करणार” – पै. किरण साकोरे
पै. किरण साकोरे म्हणाले, “काशी विश्वेश्वरांच्या व यात्रेकरूंच्या आशीर्वादाने आमच्या शरीरात व मनात नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील जनतेची सेवा करणे, समाजकार्यातून सर्वांगीण विकास साधणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. काशी-अयोध्या देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून आम्ही या सेवाभावाचे पहिले पाऊल टाकले आहे.”
ते पुढे म्हणाले, “पुण्यापासून वाराणसीपर्यंत रेल्वे प्रवास अत्यंत सुखकर झाला. आमच्या स्वयंसेवक आणि मित्रपरिवाराने यात्रेकरूंची काळजी घेतली. प्रत्येक यात्रेकरूला विश्वेश्वरांचे दर्शन आणि गंगा आरती निर्विघ्न पार पडली. आता आम्ही अयोध्येकडे प्रस्थान करीत असून प्रभू श्रीरामांच्या दर्शनाचा लाभ घेणार आहोत.”
Editer Sunil thorat






