लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, तब्बल ५ धारदार कोयते जप्त ; तडीपार व तिघे इसम अटकेत…

लोणी काळभोर (हवेली) : लोणी काळभोर पोलिसांनी गुरुवारी (दि. ६ नोव्हेंबर २०२५) घोरपडेवस्ती परिसरात केलेल्या धडाकेबाज कारवाईत तडीपार इसमासह एकूण चार संशयितांना ताब्यात घेऊन तब्बल पाच धारदार लोखंडी कोयते जप्त केले आहेत. पोलिसांच्या तत्पर आणि अचूक हालचालीमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला असल्याचे सांगण्यात येत आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली. घोरपडेवस्ती परिसरात तीन इसम कोयते बाळगून ट्रिपलसीट दुचाकीवरून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अंबिका माता मंदिराजवळ त्यांना अटक केली.
ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे अशी आहेत:
१) प्रकाश काळू कांबळे (२०, रा. कात्रज)
२) मयुरेश्वर दत्तात्रय इटकर (१८, रा. टेकवडी, पुरंदर)
३) अक्षण रविंद्र चव्हाण (१८, रा. कात्रज)
या तिघांकडून चार धारदार कोयते, दुचाकी आणि मोबाईल फोन असा सुमारे ₹१,४१,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४८८/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
त्याच दिवशी दुपारी पोलिसांच्या गस्तीदरम्यान स्मशानभूमी परिसरात तडीपार इसम रोहित महादेव पाटील (२१, रा. लोणी काळभोर) हा कोयत्यासह सापडला. त्याच्याविरुद्ध गु. र. नं. ४८७/२०२५ नुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण कारवाईत मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-५) डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, म. पो. उपनिरीक्षक पुजा माळी, तसेच पथकातील अनिल जाधव, चक्रधर शिरगीरे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रविण दडस, गणेश सातपुते, रामहरी वणवे, आण्णा माने, संभाजी देवीकर, शैलेश कुदळे, बाजिराव विर, चेतन कुंभार, प्रदिप गाडे, सचिन सोनवणे, अशोक गिरी यांनी मोलाची भूमिका बजावली.
या कारवाईमुळे भविष्यातील गंभीर घातपाताचा संभवित कट उधळण्यात पोलिसांना यश मिळाले असून लोणी काळभोर पोलिसांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
Editer Sunil thorat



