“नोबेल पुलाखाली मृत्यूशी झुंजणाऱ्या वृद्धेला दिला नवजीवनाचा आधार!” स्मितसेवा फाउंडेशन व ‘आस्क फाउंडेशन’चा संयुक्त उपक्रम…

हडपसर पुणे : शहराच्या मध्यभागी असलेल्या नोबेल पुलाखाली एका वृद्ध महिलेला अर्धमरण अवस्थेत पडलेले पाहून सामाजिक संवेदनशीलतेचा उत्कृष्ट आदर्श घालण्यात आला आहे. ‘स्मितसेवा फाउंडेशन’च्या अध्यक्ष स्मिता तुषार गायकवाड आणि ‘आस्क फाउंडेशन’चे प्रमुख दादासाहेब गायकवाड यांच्या तत्परतेमुळे ७० वर्षीय वृद्धेला नवजीवन लाभले.
सायंकाळी ऑफिसमधून बाहेर पडताना गायकवाड यांना एका अनोळखी महिलेचा फोन आला. तिचा आवाज जरी अपरिचित असला, तरी त्यात दयाभाव होता. तिने सांगितले की, “नोबेल पुलाखाली एक वृद्ध महिला निपचित पडली आहे, तिच्या अंगावर माशा घोंगावत आहेत, हालचालही दिसत नाही.” या माहितीनंतर गायकवाड यांनी तत्काळ ‘आस्क फाउंडेशन’चे दादासाहेब गायकवाड यांच्याशी संपर्क साधला आणि घटनास्थळी धाव घेतली.
तिथे पोहोचल्यावर वृद्धेची अवस्था अत्यंत भयावह होती. तिच्या शेजारून गाड्या वेगाने जात होत्या, आणि ती मात्र उपाशीपोटी निपचित अवस्थेत पडून होती. विचारपूस केल्यावर ती स्वतःचे नाव कुसुम बाळासाहेब मुसळे असे सांगत होती. ती सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील असून वय सुमारे ७० वर्षे आहे, अशी माहिती मिळाली.
तिला पाणी व अन्न देण्यात आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जीवंतपणा परत आला. तिच्या डोळ्यांतील भीती आणि उपाशीपणाची सावली नाहीशी झाली आणि तिने हळूहळू संवाद साधायला सुरुवात केली. तिच्या नजरेतून अश्रू नव्हते, तर आशीर्वादाचा वर्षाव दिसत होता, असे भावनिक दृश्य तेथे उपस्थित असणाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणणारे ठरले.
यानंतर ‘आस्क फाउंडेशन’च्या मदतीने त्या वृद्ध महिलेला सुरक्षितपणे आश्रमात हलवण्यात आले. या संवेदनशील कृतीमुळे पुण्यात पुन्हा एकदा माणुसकीचे उदाहरण जगासमोर आले आहे.
Editer Sunil thorat




